प्राचीन ग्रंथ आपल्या मनाच्या चैतन्याच्या चार मूलभूत अवस्थांचे वर्णन करून आपल्याला त्याचे रहस्य समजण्यासाठी एक मार्ग दाखवतात. 

सद्गुरु बोधीनाथ वैलाणस्वामी

हिंदु धर्म म्हणजे प्राचीन वेद आणि आगम यांतून वर्णिलेल्या विधींवर आधारित आहे, ज्यांत विविध देवदेवतांचे आवाहन करून देवत्वाचे अस्तित्व स्थापित करण्यात येते, असा सर्वसाधारण दृष्टिकोन आहे.  परन्तु हे वर्णन हिंदु धर्माचे गूढतर उपदेशांची, उदाहरणार्थ, मनाच्या चार अवस्थांबद्दलच्या त्यांच्या समीक्षेची उपेक्षा करतात. मनाच्या चार अवस्थांचे वर्णन असलेला सर्वप्राचीन ग्रंथ आहे इसवी सनापूर्वी आठव्या ते सहाव्या शकतात रचिलेले  छान्दोग्य उपनिषद. भारतातील (हिंदु) ऋषि २५०० वर्षापूर्वीपासून किंवा त्याहून आधीपासूनच  मानवाने अनुभविलेल्या मनाच्या जागृतीच्या स्थितीबद्दल समीक्षा करत होते हे बघून कित्येकांना अतिशय आश्चर्य वाटते. त्याच कल्पनांचे, त्यानंतर सुमारे सात शतकानंतर प्रसिध्द झालेल्या, मांडुक्य उपनिषदातल्या बारा ऋचांमध्ये अधिक स्पष्टीकरण करण्यात आले आहे. 

मनाच्या चार अवस्था आहेत त्या अशा: जागृत म्हणजे जागे असणे, (किंवा वैश्वानर), स्वप्न (किंवा तैजस, याचे स्पष्टीकरण मराठी वाचकांना आवश्यक नाही असे भाषांतरकाराचे मत आहे), सुषुप्ति (किंवा प्रज्ञा), म्हणजे गाढ झोप, आणि तुरीय म्हणजे समाधि.  विकिपेडियाच्या एका सहाय्यकारी लेखकाने उपनिषदांच्या या प्रतिपादनांवर असे भाष्य केले: “हिंदु धर्माच्या प्रभावाने प्राचीन भारतीय विचारांमध्ये मनाच्या जागरुकतेचे भेद आढळून येतात. मानवाच्या क्षणभंगुर, सांसारिक आत्मभावात आणि त्याच्या सनातन, अपरिवर्तिन् आत्म्यात असलेला भेद ही उपनिषदांची मध्यवर्ति कल्पना आहे.  भिन्नभिन्न हिंदु सिध्दान्त, आणि बौध्द धर्म, या दोन्हींनी या आत्म्याच्या श्रेणींवर आक्षेप घेतला आहे, परन्तु सर्वांनीच उच्च स्तरावरच्या जागृतीवर पोहोचण्यावर भ्रर दिला आहे.  योग म्हणजे  या ध्येयाच्या प्राप्तीच्या प्रयत्नासाठी अनेक प्रकारचे तंत्र आहे.”  

या चारही अवस्थाकडे अधिक खोलवर बघु या. जागे असतांना आत्म्याला स्वतःच्या बाबतीत परिमित जागृति असते आणि बाह्य वस्तूंच्या बाबतीत जाणीव असते आणि त्यांचे अनुभव घेता येतात.  स्वप्नावस्थेत आत्म्याला स्वतःच्या बाबतीत मर्यादित जाणीव असून त्याला आपल्या मनोसृष्टीची आणि आपल्या सूक्ष्म शरीराची जाणीव असते आणि त्यांचे अनुभव येत असतात. गाढ झोपेत या वस्तूंची अनुपस्थिती असते, स्वत्वाची भावना काही प्रमाणात कमी झालेली असते आणि अधिक शांति अनुभवण्यात येते.  चौथ्या अवस्थेत आत्मा आपल्या आध्यात्मिक रूपात स्थिर झालेला असतो.  तेव्हा ती व्यक्ति सर्वव्यापिन् असते, ज्या स्थितीत इतर वस्तूंचे वेगळे अस्तित्व जाणवत नाही.  आपण याची तीन खोल्यांच्या घरात राहण्याची कल्पना करू शकतो: एक जागे राहण्यासाठी, एक स्वप्न पाहण्यासाठी, आणि एक गाढ झोपण्यासाठी.  जोपर्यंत आपण घरात राहतो, तोपर्यंत आपली जाणीव मर्यादित असते. परन्तु आपण बाहेर पडलो तर आपण ही मर्यादा दूर करू शकतो आणि आपण सर्वव्यापिन् चेतना असल्याचा अनुभव घेऊ शकतो.  

मांडुक्य उपनिषदाच्या पहिल्या दोन ऋचात ही कल्पना आत्मा, ब्रह्मन आणि ॐ यांच्याद्वारे प्रस्तुत केली आहे:

१. ॐ, हा शब्द हे सर्व आहे (हे संपूर्ण विश्व). याचे उत्तम स्पष्टीकरण असे आहे: जे काही भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ आहे ते सर्व ॐ आहे. आणि त्यापलिकडे काळाच्या या तीन विभागाच्या पलिकडे जे काही आहे तेही सुध्दा खरोखर ॐ च आहे. 

२. हे सर्व ब्रह्मन् आहे.  आत्मा ब्रह्मन् आहे. याच आत्म्याला चार पद आहेत.  

“आत्मा ब्रह्मन् आहे” हे वाक्य (संस्कृतमध्ये “अयमात्मा ब्रह्म”) उपनिषदातील चार महावाक्यापैकी, ब्रह्मन आणि आत्मा यांच्या एकात्मता घोषित करणार्‍यापैकी, एक वाक्य आहे.  

ॐ च्या सहाय्याने तुरीय अवस्था प्राप्त करणे

मुंडक उपनिषद असे सांगते की ॐ च्या सहाय्याने ही एकात्मता साध्य करता येते.  “ॐ हे धनुष्य आहे; आत्मा हा बाण आहे; ब्रह्मन् हे लक्ष्य आहे. हा बाण त्या लक्ष्यावर अव्यग्र मनाने सोडला पाहिजे. तेव्हा आत्मा आणि ब्रह्मन् यांची एकात्मता होते; जसे बाण आणि लक्ष्य एक होतात.”  खचितच ॐ ह्या बाणाचा एकप्रकारे जप करून, जपयोगाने, उपयोग करता येतो.  माझे गुरुदेव, शिवाय शुभ्रमुनीयस्वामी, या अनुष्ठानाचा त्यांच्या “शिवे विलयम्” (Merging with Shiva) या ग्रंथातल्या “ज्ञातृसामर्थ्यत्वं मनोजयः” (Congnizantability) या खण्डात समजावून सांगतात:

“सत्तरावे सूत्र: आपल्या उत्पादन शक्तींचे परावर्तन आणि ती विलग्न करण्यासाठी काही विशेष मंत्रांचा जप करण्यात येतो.  ते आपल्या जागृत मनाला व्यवस्थित केन्द्रित करतात, आपल्या संस्कार चित्ताला मेळ घालतात आणि बुध्दीला आकर्षित करतात. (magnetize the brain या शब्दांचा शब्दशः अर्थ येथे लागू पडत नाही असे भाषांतरकाराचे प्रांजळ मत आहे.) यामुळे सहजप्रवृत्तीत असलेल्या उत्पादन शक्ति बौध्दिक आणि कारणचित्ताच्या विभागात ओढल्या जातात.”

“एक्काहत्तरावे सूत्र: अ-उ-म ही अक्षरे, जेव्हा यांचा अगदी बरोबर जप केला जातो तेव्हा ती स्वभावधर्माचे बौध्दिक विचारांत रूपांतर करतात आणि स्वभाव-बौध्दिक विचारांचे कारणचित्तांत रूपांतर करतात. त्याने प्रत्यक्ष अनुभव प्राप्त होतो.” गुरुदेवांनी या सूत्रावर भाष्य केले: “ॐ हा एक असा सामान्य मंत्र आहे की ज्याचा जप दीक्षा मिळालेल्या लोकांना आणि दीक्षा न मिळालेल्या लोकांना कुठल्याही स्थितीत, कुठल्याही परिस्थितीत, शरीर स्वच्छ असो किंवा अस्वच्छ असो तेव्हा सुध्दा, सुरक्षितपणे करता येतो.  त्याचा योग्य जप केल्याने शरीर, मन आणि अध्यात्म यांचा मेळ घालून आपली जाणीव उंचाविल्या जाते.”

गुरुदेवांनी स्पष्ट केले की ॐ या मंत्राचा जप परिणामकारक होण्यासाठी त्याचा उच्चार बरोबर करणे आवश्यक आहे.  (भाषांतरकार: यानंतर या परिच्छेदात ॐ चा उच्चार कसा करावा हे इंग्रजी लिपीतल्या A, U आणि M या मुळाक्षरांचा आधारे शिकविले आहे. मराठी वाचकांना याची आवश्यकता असे वाटत नाही. म्हणून ती वाक्ये येथे प्रस्तुत केली नाहीत. एवढेच सांगावेसे वाटते की अ, ऊ आणि म यांचा दीर्घ उच्चार करून ॐ म्हणायचा असतो.) प्रत्येक उच्चार सात सेकंद एवढा लांब करायचा असतो: दोन सेकंद अ, दोन सेकंद ऊ आणि तीन सेकंद म, आणि त्यानंतर पुन्हा उच्चार करण्यापूर्वी दोन सेकंद शांतता.  ही तीन अक्षरे एकत्र उच्चारायची असतात: अऊम (शांतता), अऊम (शांतता), अऊम (शांतता) याप्रमाणे.  पहिल्या अ च्या उच्चाराने चेतापिंड जालिका (solar plexus) याचा, आपल्या छातीचा स्पंदनाचा अनुभव येतो. दुस‍र्‍या ऊ ने आपला गळ्याच्या स्पंदनाचा अनुभव येतो. आणि तिसर्‍या म ने आपल्या शिराचा वरच्या भागाचे स्पंदन होते.  

मांडुक्य उपनिषद (श्लोक 9-12) गुरुदेवांच्या अनुशासनाचे, ॐ चे भाग वापरून आपल्या अधिक मार्मिक स्तरावर पोहोचण्याचे समर्थन करून, ॐ च्या या “चतुर्थांशांचे” आणि जागृतीच्या चार अवस्थांचे स्पष्ट संबंध दाखवते.   

९. वैश्वानर आत्मा, ज्याचे कर्मस्थान जागृत अवस्था आहे, ते आहे “अ”, ॐ चे पहिले अक्षर, तो सर्वव्यापी असल्यामुळे किंवा तो प्रथम असल्यामुळे. ज्याला हे माहित आहे तो आपले सर्व इच्छित प्राप्त करतो आणि प्रथम (थोर लोकांमध्ये) होतो. 

१०.तैजस आत्मा, ज्याचे कर्मस्थान आहे स्वप्नावस्था, ते आहे “ऊ”, ॐ चे दुसरे अक्षर, त्याच्या श्रेष्ठत्वामुळे किंवा मध्ये असल्यामुळे. हे ज्याला समजले तो उच्च प्रकारचे ज्ञान प्राप्त करतो, सर्वांकडून त्याला सारखेच वागविण्यात येते आणि त्याच्या कुटुम्बात ब्रह्मन् बद्द्ल अज्ञानी असे कुणीच नसते.  

११. प्रज्ञा आत्मा, ज्याचे कर्मस्थान आहे गाढ झोप, ते “म”, ॐ चे तिसरे अक्षर, कारण दोघेही माप आहेत आणि शिवाय त्यांत सर्व एक होतात. हे ज्याला समजले तो सर्व गोष्टींचे मूल्यमापन करू शकतो आणि त्याला स्वतःतच सर्व गोष्टींचे आकलन होते. 

१२. चौथी अवस्था, तुरीय. या अवस्थेला काहीही भाग नसतात आणि काहीही संबंध नसतात; चमत्कार येथे थांबतात; ते सगळे उत्तम आहे आणि अद्वैत आहे. ॐ हा खरोखर आत्मा आहे. जो हे जाणतो तो स्वतः आत्म्यात विलीन होतो- होय, जो हे जाणतो तो. (भाग नसलेला म्हणजे आवाजाशिवाय. तुरीय ध्वनिरहित ॐ आहे.)

“ज्ञातृसामर्थ्यत्वं मनोजयः” या खण्डात गुरुदेव जेव्हा स्वाभाविक मनापासून बौध्दिक मनाकडे जाण्याचा उल्लेख करतात, तेव्हा ते आपल्या जागृतीची स्थिती वरची करण्याबद्दल सांगत आहेत. उदाहरणार्थ, भय ही एक नकारात्मक भावना आहे, जिच्यापासून आपण काही मिनिटे ॐ चा जप करून वरच्या स्तरावर येऊ शकतो. खळबळीत मनस्थितीतून आपण शांत मनस्थितीत त्याचप्रकारे येऊ शकतो. क्रोधाचे रूपांतर आपण क्षमा या भावनेत करू शकतो.  कुणी नकारात्मक जाणीवेत असेल तर ती व्यक्ति सकारात्मक स्थितीत य़ेऊ शकते. 

“शिवेन विलयम्” या ग्रंथात गुरुदेव इतरत्र असे दाखवितात: “सर्वसाधारणपणे लोक आपल्या समस्याकडे त्यांच्याशी स्वतः एकजीव होऊन अतिशय गंभीरपणे बघतात. जेव्हा त्यांना क्रोधाचा अनुभव येतो तेव्हा ते क्रुध्द होतात. जेव्हा त्यांना परमसुखाचा अनुभव येतो, तेव्हा ते आनन्दमय असतात.  गूढवादी अनुभवापेक्षा जो अनुभवतो त्याच्याशी एकरूप होतो. तो स्वतःला आपल्या अंतःकरणात क्रम करणारा एक शुध्द जागृत वस्तु समजतो.  तो जेव्हा सान् फ्रान्सिस्कोत असतो तेव्हा तो सान् फ्रान्सिस्को नसतो, तो जेव्हा क्रुध्द असतो तेव्हा तो क्रोध नसतो.  तो स्वतःला म्हणतो: मी शुध्द शक्ति आहे. मी ती आध्यात्मिक शक्ति आहे जी मनातून आणि शरीरातून वाहत असते. मी हे शरीर, मन किंवा भावना नाही. मी जे विचार करतो ते विचार मी नाही किंवा जे अनुभवतो ते अनुभव नाही.  याप्रमाणे तो स्वतःसाठी एक नवीन व्यक्तित्व स्थापित करतो की जेणेकरून तो एक स्वतंत्र चर असून आपल्या मनातच तो कुठेही प्रयाण करू शकतो. अशी व्यक्ति सर्वदा पर्वतशिखरावर असते.

आपण स्वतः कोण आहोत या कल्पनेचे आपण परिक्षण केले पाहिजे. जेव्हा आपल्याला पूर्णपणे ठीक असल्याचे जाणवायला लागते तेव्हा “मी” या शब्दाचा अर्थ बदलू लागतो. यापुढे “मी” म्हणजे हे शरीर हा अर्थ होत नाही.  “मी” म्हणजे उर्जा, जागृति, आणि इच्छाशक्ति. लवकरच आपल्याला पूर्ण सत्य उमजते की आपण या शरीरात वास्तव्य करत आहोत, परन्तु ज्या शरीरात आपण राहत आहोत ते शरीर आपण नाही. “मी” या शब्दाचे परिक्षण करा आणि प्रामाणिकपणे तुमच्यासाठी त्याचा काय अर्थ आहे ते बघा.”