image

संपादकाच्या पीठावरून-

देवालय: संस्कृतीचा एक कल्पतरु

______________________

जागृत मनाने आपल्या घरातल्या देवघराचा देवालयाशी संबंध प्रस्थापित करून आपले कुटुम्ब परंपरा कायम ठेवते आणि नाते दृढ करते.

______________________

सद्गुरु बोधीनाथ वैलाणस्वामी

Read this article in:
English |
Hindi |
Gujarati |
Italian |
Marathi |

गेली जवळजवळ २५ वर्षे, सुमारे १९७५ ते २००१ पर्यंत “आजचा हिंदुधर्म” (Hinduism Today) या त्रैमासिकाचे संस्थापक, सद्गुरु शिवाय शुभ्रमुनीयस्वामी, हे देवालयांच्या स्थापनेचे महत्वाचे कार्यकर्ते होते. गुरुदेवांनी अमेरिका, कॅनडा, गुआडालूपे, डेन्मार्क, इंग्लंड, फिजी, जर्मनी, मॉरिशस् न्यूझीलंड, रियुनियन् रशिया, स्वीडन, आणि श्रीलंका या देशांत ३७ मंदिरांचे मार्गदर्शन केले, प्रत्येक समुदायाला किंवा मंदिराला देवाची एक मूर्ति, बहुतेक प्रसंगी गणपतीची मूर्ति दिली आणि आवश्यकतेप्रमाणे मार्गदर्शन केले. इतरही अनेक मंदिरांना त्यांनी आपला जगतातला अनुभव आणि आपले समुदाय स्थापन करण्याचे ज्ञान देऊन किंवा Hinduism Today मध्ये प्रसारित करून त्यांच्या प्रकल्पाला मदत केली.

स्वतःच्या मंदिराशी औपचारिक काहीच संबंध नसलेल्या मंदिरांच्या स्थापनेसाठी गुरुदेवांनी आपली एवढी शक्ति का खर्च केली? त्यांनी असे केले कारण त्यांना खात्री होती की देवालयच हिंदु संस्कृती शाश्वत करते. त्यांनी असे समजावून सांगितले की हिंदु लोकांनी दुसर्या देशात स्थानांतर केले आणि तेथे त्यांनी देऊळ बांधले नाही तर काही पिढ्यानंतर त्यांच्या बहुमूल्य संस्कृतीचा लोप होतो.

जुलै २००० मध्ये झालेल्या एका सत्संगात एका भक्ताने गुरुदेवांना विचारले: “हिंदु संस्कृतीला काय होत आहे? असे दिसते की “बॉलिवुड” नटनट्या पाश्चात्य वळण घेत आहेत आणि सर्वांना तेच करायला उत्तेजन देत आहेत. हिंदु संस्कृति किंवा भारतीय संस्कृति यानंतर फार काळ टिकून राहील काय?

गुरुदेवांनी उत्तर दिले: “आज आपल्याला जगात असे दिसून येते की ही कलहप्रीय संस्कृति-जेथे लोकांचे एकमेकांशी पटत नाही, परन्तु कधीकधी ते पटत नसूनही पटत असल्याचे सोंग करतात-कार्यालयातून, कारखान्यातून आणि निधर्मी कार्यातून निर्माण होते. भारतीय संस्कृतीचा र्हास भारतात होत असेल पण तिची पाश्चात्य देशात देवालयातील पूजेमुळे प्रगति होत आहे. आपले परमेश्वराशी असलेले नाते, देव देवतांशी असलेले नाते, आपले स्त्री, पुरुष आणि बालबालिकांचे असलेले नाते ठरवते. ज्याप्रमाणॆ देवळात आपण गर्भगृहातल्या देवतांच्या भावनेबद्दल आणि तेथून प्रसारित होणार्या स्पंदनाबद्दल जागृत असतो त्याप्रमाणे इतर लोकांच्या भावनांबद्दल सहृदय असण्यापासून संस्कृतीची निर्मिती होते. आपल्या जीवनात धर्म नसला आणि धर्माचे स्वगृही पालन न केल्यास, देवालयात त्या धर्माचे पालन न केल्यास, वर्षातून एकदा दूरच्या यात्रेला न गेल्यास संस्कृति ढळते आणि कलहप्रीय संस्कृति पुढे येते.”

ते पुढे म्हणाले: “जरी पाश्चात्य संस्कृतीतील उत्कृष्ट गोष्टी दूरच्या पौर्वात्य देशात नेण्याचा काही लोक प्रयत्न करीत असले तरी त्या दूरच्या पौर्वात्य देशातील उत्कृष्ट गोष्टी पाश्चात्य देशात नेण्याचा प्रयत्न अनेक लोक करीत आहेत. जोपर्यंत धर्म, पूजा, आणि यात्रेची प्रथा, आणि आपल्या धर्माचे संस्कार उपस्थित आहेत, तोपर्यंत आपली संस्कृति अस्तित्वात राहील.”

हिंदु संस्कृति आणि भक्तीच्या प्रथा यांचे जी कुटुम्बे पालन करतात, देवालयाला नियमित, कमीतकमी आठवड्यातून एकदा दर्शनाला जातात, त्यांच्या घरासाठी हे मंदिर एक प्रभावशाली आध्यात्मिक केन्द्र म्हणून कार्य करू शकते. आपली संस्कृति सुदृढ करण्याचे कार्य अनेक स्तरांवर होऊ शकते.

आपल्या अनेक परंपरांचे आणि प्रथांचे पालन करणे हा त्याचा सर्वात मूलभूत मार्ग आहे. कुठलाही धार्मिक हिंदु परमेश्वराच्या पवित्र आलयाकडे व्यवस्थित तयारी केल्याशिवाय पाऊल टाकणार नाही. सर्वसामान्य दिवस असो किंवा मोठ्या उत्सवाचा दिवस असो, यांत शुचिर्भूत होणे, धूतवस्त्र परिधान करणे, आणि नैवेद्याचे ताट तयार करणे या गोष्टींचा यात समावेश होतो. देवदर्शनाला जाण्यासाठी या सर्व महत्वाच्या गोष्टी आहेत.

मंदिरात पोहोचल्यावर आपण आपले पाय धूतो, आणि पादत्राणं ठरविलेल्या पद्धतीने हाताळतो. त्यानंतर रूढीप्रमाणे देवदेवतांना दंडवत, प्रदक्षिणा, आणि नंतर आणलेल्या नैवेद्य प्रेमाने अर्पण करणे. पूजेला उपस्थित असतांना पुरुष आणि स्त्रीयांना मंडपात कदाचित् वेगळ्या बाजूंना बसावे लागेल. पूजाविधीच्या महत्वाच्या ठिकाणी आपण प्रार्थना करतो आणि ठराविक प्रकारे प्रतिसाद देतो. बालबालिका जसजसे आपल्या आईवडिलांचे अनुसरण करतात तसतशी त्यांची पूजेबद्दल आणि पवित्र वस्तुबद्दलची गुणज्ञता, थोर मंडळींबद्दल आदर, शारिरिक स्वच्छता आणि मानसिक शुद्धता यांचे महत्व कळणे, आणि कौटुम्बिक आणि सामाजिक भक्तिबद्दल आवड यांची वृद्धी होते.

वर्षानुवर्ष केलेल्या या अनुष्ठानामुळे विनय, भक्ति यांसारखे गुण जे उत्तम चारित्र्याचे दर्शक आहेत, ते अधिक तीव्र होऊ शकतात. भक्तिचा अर्थ येथे आहे परमेश्वरावरचे प्रेम. हे गुण, जे प्रत्येक सुसंस्कृत हिंदु व्यक्तीत असतात, त्यांची वृद्धि पाश्चात्य देशात वाढलेल्या व्यक्तीमध्ये नियमित पूजाअर्चांमध्ये भाग घेतल्याशिवाय कदाचित् होणार नाही.

मंदिराचा दुसर्या स्तरावरचा प्रभाव पडतो तो घरी देवघर स्थापन करून रोज पूजा करण्याची प्रथा सुरु होण्यात. शक्यतो हे देवघर एका वेगळ्या कक्षांत असावे, एखाद्या कपाटांत किंवा भिंतीवरच्या फळीवर नाही. अशी खास राखून ठेवलेली जागा घरांतील सर्वांना परमेश्वराचा अधिक विचार करण्यास प्रवृत्त करते आणि स्वतःच्या वर्तणुकीबद्दल मनन करावयास लावते आणि तेणेकरून, परमेश्वराच्या उपस्थितीत वास्तव्य असल्यामुळे क्रोध करण्यास किंवा वादविवाद करण्याची प्रवृत्ति कमी होते.

देवालयात आठवड्यातून एकदा दर्शनाला गेल्याने खरे तर त्याचे पावित्र्य काही अंशी घरातल्या देवघराला मिळते. माझ्या गुरूंनी असे समजावले की मंदिरातून घरी परत आल्यानंतर देवघरात तेलाचा दिवा लावला तर मंदिरातली शक्ति आपल्या घरात येते. भक्तिपूर्वक केलेले हे कार्य देवळातल्या देवदेवतांना घरातल्या देवघरात आणते आणि अंतर्लोकातून ते त्या कुटुम्बाला आशीर्वाद देतात आणि त्या घराचे संरक्षण करतात.

मंदिराच्या सांस्कृतिक प्रभावाच्या तिसर्या स्तराचा प्रारंभ होतो जेव्हा एक कुटुम्बीय, सर्वसाधारणपणे पिता, नियमितपणे घरी पूजा करतो. एक प्रकारे तो त्या कुटुम्बाचा पुरोहित होतो, देवळातल्या पुजार्याचे अनुकरण करून, त्यापेक्षा सोप्या प्रकारची, सार्वजनिक नसलेली, आत्मार्थ नावाची पूजा करतो. अशी पूजा रोज केल्याने त्या घरातले धार्मिक स्पंदन अविचलितपणे शक्तिशाली होते.

अगदी योग्यप्रकारे, पूजाविधी हिंदु धर्माच्या प्रसिद्ध उदारचरित आतिथ्याच्या कल्पनेवर आधारित आहे. सर्व अतिथींचे स्वागत करण्यात येते आणि त्यांना ते जणुकाही देवच आहेत असे वागविले जाते. परमेश्वर या कल्पनेला अपवाद नाही. रोज सकाळच्या पूजेला, सर्व कुटुम्बीय त्यांच्या नीट सजविलेल्या देवघरात देवाचा एक अतिथीराज म्हणून सन्मान करायला एकत्र येतात. त्याचे हार्दिक स्वागत करतात, बसायला आसन देतात, तहान भागवायला पाणी देतात, अभिषेकस्नान करून सुन्दर वस्त्र अर्पण करतात, त्याला आनंदित करायला उत्तम सुवासिक धूप लावतात, आरती करतात, फुले वाहतात, मंत्र जप करून नैवेद्य अर्पण करतात. ही एक अत्यंत सलगीचे खासगी परस्पर कृत्य असते.
या पूर्ण पूजाविधीत पुजारी गोड आवाजात वरील प्रेमळ कृत्यांचे वर्णन संस्कृत मंत्रांचे पठण करून करत असतो आणि देवाचे आशीर्वाद मागत असतो. शेवटी पुजारी त्या देवतेचे त्याच्या उपस्थितीबद्दल आभार मानतो, देवाला परतीच्या प्रवासासाठी निरोप देतो आणि अज्ञानाने पूजेत काही चुका झाल्या असतील त्याबद्दल क्षमा मागतो.

मंदिराच्या प्रभावाच्या चौथ्या स्तरावर आपली अशी भावना होते की आपल्या देवघरातील प्रमुख देवता, उदाहरणार्थ भगवान शिव, किंवा भगवान व्यंकटेश्वर, हेच या घराचे मुख्य आहेत. असे जेव्हा होते तेव्हा आपण आधी देवाला नैवेद्य दाखविल्याशिवाय भोजन करण्याचा विचारही करणार नाही. आपण सदासर्वकाळ देवाची, घर सोडून बाहेर जातांना आणि घरी परत आल्यावर, अत्यंत संक्षिप्त का होईना, पूजा करण्याची इच्छा करू.

हिंदु संस्कृतीत घराची एवढी दृढता वाढण्यासाठी पूर्ण कुटुम्बाने यांत सामील होण्याची आवश्यकता आहे. उदाहरणासाठी एक गोष्ट सांगतो. सिंगापूरमध्ये आमच्या एका भक्तावर रविवारी सकाळी असलेल्या हिंदुधर्मावरील वर्गाची जबाबदारी होती. त्याला असे दिसून आले की आईवडिल सर्वसाधारणपणे त्यांच्या मुलांना त्या वर्गासाठी सोडून दोन तास बाजार करायला जायचे, परत येऊन मुलांना घेऊन जायचे, आणि या प्रकारे आपली मुले उत्त्म हिंदु होतील अशी अपेक्षा करत होते. असला मार्ग काही कला शिकण्यासाठी, नृत्य, वादन, इत्यादि शिकण्यासाठी, उपयुक्त असला तरी, हिंदुधर्माचा अभ्यास करण्यासाठी त्याचा काहीच उपयोग होत नाही.

फरक हा आहे. मुलांनी नृत्य, गायनवादनादि शिकण्यासाठी आईवडिलांनाही ते आले पाहिजे अशी आवश्यकता नाही. परन्तु हिंदुधर्माचा अभ्यास करावयाचा असेल तर संपूर्ण कुटुम्बाने एकत्र येऊन त्याचा अभ्यास करायला हवा. कारण हिंदु धर्म हा सर्व परिवेष्टित करणारा, कुटुम्बाच्या जीवनातल्या दैनिक आणि साप्ताहिक अंगांना परिवेष्टित करणारा, केवळ देवघरातच नाही, असा जीवनमार्ग आहे. अपत्यांनी देवालयात हिंदुधर्माचा अभ्यास करणे महत्वाचे आहे. तथापि त्यात आईवडिलांनीही भाग घेतल्यास हिंदु संस्कृतीची आणि घरातील धार्मिक संभाषणांची वृद्धि होण्याची संभावना जास्त आहे. वस्तुस्थिति ही आहे की काही हिंदु संस्था आईवडिल त्याबरोबरच्या प्रौढांच्या वर्गात सामील नसतील तर मुलांना त्यांच्या वर्गात प्रवेश देत नाहीत.

(या शेवटच्या परिच्छेदाचे शब्दशः भाषांतर करणे अशक्य असल्यामुळे गुरुदेवांच्या कल्पनेचे शक्य तेवढे बरोबर वर्णन देत आहे. क्षमस्व.)
मला हिंदु देवालयांची विद्युत शक्तीच्या विभजन/प्रसरणाशी तुलना करावीशी वाटते. आम्ही राहतो त्या दूरच्या हवाआईच्या काउआई या बेटावर एक मोठे विद्युतनिर्मितीचे केन्द्र आहे. त्यापासून पाच प्रसरणाच्या तारा पाच उपस्थानाकडे जातात. तेथून त्या प्रदेशातील ग्राहकांना ही वीज पोहोचवण्याची सोय केली असते. याच्यात आणि आध्यात्मिक शक्तीच्या प्रसरणात बरेच साम्य आहे. आध्यात्मिक शक्ति आकाशमंडलातून (विद्युतनिर्मितीकेन्द्र) पाच देवालयात (उपस्थानात), तेथून लोकांच्या घरात (ग्राहक). वीज घरातील सर्वप्रकारची उपकरणे चालवते. देवालयाकडून मिळालेली दैवी शक्ति कुटुम्बाचा मार्ग उजळते आणि संस्कृतीला जागृत करते.

॥ ॐ नमः शिवाय ॥

image

• • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • •