Read this article in:
English |
French |
Gujarati |
Hindi |
Marathi |
Spanish |
Tamil |
Russian |

आजच्या विश्व विज्ञापनाच्या जगात आपल्याला मानवी स्वभावाबद्दल अनेक दृष्टिकोन अगदी नियमानी आढळून येतात. त्यांच्या एका परिसीमेला असे मत आहे की मानव हा आनुषङ्गिक दुर्बल, अपूर्ण आणि पापी वृत्तीचा आहे- दैवीकृपेशिवाय उद्धार होऊ शकणार नाही असा- आणि तो तसाच राहील. आणि दुसर्‍या परिसीमेला असे मत आहे की मानव हा आनुषङ्गिक दिव्य आहे.

इसवी सन २०११ च्या ऑगस्टमध्ये कॅरिबियन प्रदेशांत वास्तव्य करणार्‍या हिंदु लोकांशी माझे बोलणॆ झाले त्या बोलण्यात आलेल्या विषयांपैकी हा एक विषय होता. मला असे सांगण्यात आले की “तू पापी आहेस आणि तुला उद्धाराची गरज आहे” हा संदेश जोराने पसरवून हिंदु लोकांचे धर्मांतर करवण्याचा प्रयत्न चालू आहे. मला नेहमी विचारण्यात येते, “तीव्र इच्छाशक्तीच्या धर्मप्रसारकांना तोंड देण्याचा प्रसंग आला तर आम्ही काय म्हणावे? हिंदुधर्माचा या बाबतीत काय दृष्टिकोन आहे?” आपला दृष्टिकोन प्रस्थापित करण्यासाठी तीन प्रभावी स्वामींनी केलेल्या वचनांवर विचार करूया.

प्रथम वचन आहे १८९३ मध्ये झालेल्या विश्व धर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांनी मोठ्या धैर्याने दिलेल्या भाषणांतले. स्वतःला उमजले ते सत्य त्यांनी अशा रितीने स्पष्टपणे व्यक्त केले:”अस्तित्व आणि भावत्व ही दोन्ही एकाच सत्याची आपल्या बुद्धिमत्तेप्रमाणे कळणारी रुपे आहेत. दैवी सिद्धि आणि आध्यात्मिक परिपूर्णता या दोन्ही अवस्था प्राप्त करून घेण्याचे मानवाला वचन आणि शक्यता आहे, आणि म्हणून मानव हा परमेश्वरच होत असलेला जीव आहे, कारण त्याचे मानुष्य हे परमेश्वराचेच स्वतःचे एक वैयक्तिक दर्शन आहे. म्हणून मानवाला पापी म्हणणे हे मानवी स्वभावाला निंदात्मक आहे. शिवाय, परमेश्वर जर परमसत्य आणि परमात्मा असेल तर पापासारखे बाह्य तत्व त्याच्या गर्भगृहावर कसे आक्रमण करू शकेल? हिंदु धर्मीय तुम्हाला पापी म्हणायला नकार देतात. होय, पृथ्वितलावरच्या देवमूर्ति, पापी? मानवाला पापी म्हणणे हेच पाप आहे! मानवी स्वभावावर लावलेला हा कलंक आहे.”

चिन्मय मिशनचे संस्थापक स्वामी चिन्मयानंद यांनी असे स्पष्टीकरण केले: मानव वस्तुतः देवात्मा आहे. परन्तु त्याचे हे देवत्व त्याच्या मनातल्या इच्छा आणि विचार यांच्या मायापटलामुळे दिसेनासे झाले असते. यांच्या अनेक प्रकारांमुळे आणि तीव्रतेप्रमाणे अनेक प्रकारची मानवी रुपे उत्पन्न होतात. या इच्छांचे आणि विचारांचे आच्छादन काढून मानवाचे स्वाभाविक देवत्व प्रस्तुत करणे हेच आपल्या धर्मग्रंथात कल्पिलेले परमध्येय आहे.

माझे गुरु आणि “साम्प्रत हिंदुधर्म” (Hinduism Today) या त्रैमासिकाचे संस्थापक सद्गुरु शिवाय शुभ्रमुनीयस्वामी यांनी आपल्या दैवी प्रकृतीचे अत्यंत समर्पक वर्णन केले आहे: या क्षणी आपण आपल्या गाढ चित्तात परिपूर्ण आहोत, आपल्याला ती परिपूर्णता प्राप्त करून त्या अपेक्षित परिपूर्णतेप्रमाणॆ वागले पाहिजे. या भौतिक शरीरांत आपला जन्म झालेला आहे आणि यातच आपली प्रगती होऊन आपल्या दैवी सामर्थ्याकडे आपल्याला पोहोचायचे आहे. आपल्या धर्मात या मार्गात इतर अनावश्यक अनुभव निर्माण न करता ही एकात्मता प्राप्त करण्याचे ज्ञान आहे.

मानवी स्वभावाचे हे दोन परस्परविरोधी दृष्टिकोन- पापमूर्ति आणि देवमूर्ति- मिडलॅंड, टेक्सास, या शहरी २०१२ मध्ये झालेल्या एका आंतरधर्मीय चर्चेत स्पष्टपणे एकत्र प्रस्तुत करण्यात आले. या चर्चेत मी हिंदुधर्माचे प्रातिनिध्य केले. “तुमच्या धर्मात मानुष्य (humanity) हे एक कुटुम्ब समजले जाते काय?” ह्या प्रश्नाचे जेव्हा पाच धर्मांच्या प्रतिनिधींनी उत्तर दिले तेव्हा हा विषय उभा राहिला.

माझे उत्तर असे होते: जातीय आणि देश यांच्या भिन्नतेबद्दल सहिष्णुता या गुणांचा उद्भव होऊ देणार्‍या हिंदु धर्माचा जो विश्वास आहे तो असा: सर्व मानवजात गुणी आहे, आपण सर्व परमेश्वराने निर्माण केलेले दैवी व्यक्ति आहोत. हिंदु धर्माला काही व्यक्ति दुष्ट असतात आणि काही सद्गुणी असतात ही कल्पना मान्य नाही. हिंदु लोक असे मानतात की प्रत्येक व्यक्ति मुळापासून गुणी असा एक देवात्मा आहे. आपले धर्मग्रंथ आपल्याला असे सांगतात की प्रत्येक आत्मा परमेश्वरातून निर्माण होतो, जणुकाही अग्नीच्या फुल्लिंगाप्रमाणे. तेथे त्याची पारमार्थिक यात्रा सुरु होते जी शेवटी त्याला परत परमेश्वराकडे पोहोचवते. आपल्याला त्याची जाणिव असो वा नसो, सर्व मानवजात या प्रवासावर निघाली आहे.

यानंतरचे व्यक्ते, बॅप्टिस्ट ख्रिश्चन पंथाचे डॉ. रॅंडल एव्हरेट, यांनी एक अत्यंत वेगळा अभिप्राय प्रस्तुत केला. “मानवजातीची एकात्मता या विषयावर ख्रिश्चन आणि इतर काही धर्म यांत मतान्तर आहे. आम्हीही मानवजातीच्या एकात्मतेची कल्पना मान्य करतो, पण त्याचे कारण हे की आपण सर्व पतित लोक आहोत. आपण स्वाभाविक गुणी आहोत असे आम्ही मान्य करीत नाही. आम्ही असे समजतो की आपण स्वाभाविकत: स्वार्थी आणि स्वयंकेंद्रित (self-centered) असतो, म्हणून आपल्याला मुक्तीची आणि उद्धाराची आवश्यकता आहे, आणि ख्रिस्त आपल्याला या (स्वार्थी आणि स्वयंकेंद्रित) अंध:कारातून मुक्त करतो.”

मानव स्वाभाविक पापवृत्तीचा नाही किंबहुना मानवाचे सत्व हे परिपूर्ण आणि दैवी आहे, या हिंदु धर्माच्या श्रद्धेचे जवळून परिक्षण केले तर आणखी एक प्रश्न उद्भवतो: पापाबद्दल हिंदु धर्माचे काय मत आहे? या प्रश्नाचे गुरुदेव “शिवेन सह नर्तनम्” (Dancing with Shiva) या ग्रंथात असे उत्तर देतात: जगात सद्गुण आणि अवगुण बघण्याऎवजी आपण देहप्राप्ति झालेल्या आत्म्याचे गुण एकमेकात गुंतलेल्या तीन भागात आहेत असे समजतो: भौतिक/शारिरिक, बौद्धिक/मानसिक आणि आध्यात्मिक. जेव्हा बाह्य किंवा उपजत नैसर्गिक स्वभाव प्रबळ असतो तेव्हा क्रोध, भय, लोभ, मत्सर, द्वेष, आणि चकारी करणे यांकडे मनोवृत्ती वळते. जेव्हा बुद्धि प्रबळ असते, तेव्हा गर्व आणि चिकित्सक विचार या गुणांचा प्रभाव असतो. जेव्हा कारण चित्त प्रगट होते तेव्हा सुसंस्कृत गुणांचा जन्म होतो: दया, अंतर्ज्ञान, अमानित्व, इत्यादि. अल्पवयीन जीवात्म्याचे स्वाभाविक पाशवी गुण बलवान असतात. बुद्धीची वॄद्धि अद्यापि झाली नसल्यामुळे या प्रबळ उर्मींना आवरण्याला ती उपस्थित नसते. जेव्हा बुद्धीची वृद्धि होते तेव्हा स्वभावजनन्य वृतींचा र्‍हास होतो. जेव्हा जीवात्मा प्रगट होतो, आणि परिपक्व बुद्धीवर वर्चस्व मिळवतो तेव्हा हे मानसिक जू ढिले होते आणि काढून टाकण्यात येते.

मानवाच्या या त्रिविध – नैसर्गिक, बौध्दिक आणि आध्यात्मिक – स्वभावांचे ज्ञान झाले की लोक ईश्वरी वृत्तीने का वागत नाहीत, उदाहरणार्थ, क्रोधग्रस्त होणे, दुसर्‍यांना दुःखी करणे, याचे कारण कळते. मानवाला केवळ त्याचे सत्व नसून बाह्य स्वभावही असतो. तथापि, मानवाचे कर्म, ते हितकारक असो, किंवा हानिकारक असो, पापी किंवा दैवी असो, ते सर्व एका शक्तिचे प्रदर्शन आहे. ही शक्ति आपल्या शरीरात असलेल्या सूक्ष्म शर्रीरातल्या चौदा चक्रांतून आपले अस्तित्व प्रगट करत असते.

आपल्यापैकी बर्‍याच लोकांनी भारतातल्या देवळात पाणी पुरविण्याची पद्धत पाहिली आहे: एक लांब नळी, आणि तिला अनेक तोट्या. अनेक लोकांना देवळात प्रवेश घेण्यापूर्वी हात-पाय धुवायला पाणी घेता येईल अशा. आपली शक्ति आणि हे चक्र यांसाठी ही एक उत्तम उपमा आहे. आपले शरीर म्हणजे चौदा तोट्या असलेली ही लांब नळी. पाणी ते पाणीच; ते कुठल्याही तोटीतून बाहेर येऊ शकते आणि तरी ते पाणीच असते. त्याचप्रमाणे ही शक्ति कुठल्याहि चक्रातून प्रगट होऊ शकते; ती शक्तिच.

वरच्या चक्रातून वाहत असलेली शक्ति आपले कारणचित्त किंवा आध्यात्मिक स्वभाव प्रगट करीत असते. या शक्तिला वरील चक्रातून वाहत राहण्यासाठी तिच्यावर नियंत्रण ठेवण्यासाटी किंवा तिला मार्गदर्शन करण्यासाठी आपण काय करू शकतो? गुरुदेव म्हणायचे: “आपली जागृति जशी वाहते त्या दिशेला ही शक्ति वाहते. आपण आपल्या शक्तिचे नियंत्रण नियमित ध्यान करून आणि घरातल्या देवघरांत धार्मिक क्रिया, जप, पूजा करणे, पूजेसाठी उपस्थित असणे, आणि देवळांत नियमीत जाणे, या कर्मांनी करू शकतो. सुसंस्कृत संगीताचे वादन, गायन आणि श्रवण, आणि पारंपारिक नृत्य, आणि इतर कौशल्यपूर्ण कलांचा अभ्यास करणे ह्या सुद्धा आपली शक्ति वरिष्ठ चक्रातून नियंत्रित करण्याचे मार्ग आहेत.

नियमाने केलेले कर्म आपली शक्ति कशी वाहते ते ठरवते. आपण आध्यात्मिक मार्गावर एकाग्रतेने क्रमण करीत असलो तर कधी कधी आपण दैवी प्रेमाच्या विशुद्ध चक्रापर्यंत पोहोचू शकतो. आणि अशी आशा करुया की आपण अनाहत चक्र, जे सरळ अनुभवाचे चक्र आहे, त्याला भेट देऊ, ज्या स्थितीत पोहोचल्यावर आपण आपल्या मनाचे परिक्षण करून आपल्याला स्वतःबद्दल काय आवडते आणि काय आवडत नाही ते ओळखू शकतो आणि जे आपल्याला आवडत नाही ते बदलू शकतो. शिवाय आपण इच्छाशक्तीच्या मणिपूर चक्रात प्रवेश करू शकतो. आपण नियमित आध्यात्मिक/धार्मिक कार्य केले तर हे गुण आपण प्रगट करू शकतो.

आपण आपल्या शक्ति वरच्या स्तरावर स्थापित केल्या नाहीत तर आपण एक सामान्य जीवन, इच्छाशक्ति, मति, स्मरणशक्ति, आणि कदाचित् भय आणि कधीकधी क्रोध, या चक्रांमध्ये घालवतो. या शक्तींचा प्रवाह आपण अनात्म्य बुद्धीने अवलोकिला तर आपण त्यांचा प्रवाह आपण ज्या कार्याची निवड करतो त्या कार्यात त्यांचे नियंत्रण करु शकतो.

मला असे म्हणावेसे वाटते की आपला अंतरात्मा परिपूर्ण आहे आणि आपले बाह्य स्वरूप अपूर्ण आहे. आपल्या अंतरात्म्याशी आत्मीयता दाखवून आपण आपले समाधान मानून घ्यावे आणि आपल्या बाह्य स्वरूपाला अडचणी आहेत. या अडचणी दूर करण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो, हेच या पृथ्वीवरच्या आपल्या जीवनाचे ध्येय आहे: आपण स्वतः प्रयत्न करून, अभ्यास करून, प्रगति करून, सरतेशेवटी परमात्म्याचे ज्ञान मिळविणे. या आपल्या दैवी स्वरूपावर विश्वास असलेल्या मनोवृत्तीमुळे आपण आपल्या न्यूनतेबाबतीत आणि अडचणींबाबतीत अनासक्त असतो. आपली शक्ति वेगवेगळ्या चक्रातून वाहत आहे एवढेच, जसे पाणी एका किंवा दुसर्‍या तोटीतून वाहते तसेच. आपण कोण आहोत हा प्रश्न नाही. आपल्याला जाणिव होते की आपण या शक्तीच्या प्रवाहाचे नियंत्रण करू शकतो. “आज मी कुठली तोटी उघडू? माझ्या शक्तीचा प्रवाह कसा असावा असे मला वाटते? माझ्या कुठल्या वाईट सवयीची सुधारणा मला आज करायची आहे?” आपण या सर्व गोष्टींचा अमानित्वानी विचार केला तर त्या हाताळणे अधिक सोपे होते.

चौदा चक्रांची ही कल्पना आपल्या चुकांच्या संबन्धी आपली मनोवृत्ती योग्य प्रकारे ठेवते. त्यांमुळे आपला उत्साहभंग होत नाही. आपल्या चुकांमुळे, उदाहरणार्थ कधी दुसर्‍यांना दुःखी करणे, यासारख्या वर्तणुकीने आपण दैवी आहोत ही वस्तुस्थिती बदलत नाही. हिंदु धर्मात उपलब्ध असलेल्या आचारांचे पालन करून आपण या न्य़ूनतेवर विजय मिळवून आपल्या आंतरिक देवत्वाचा अनुभव अधिक तीव्र करू शकतो. जेव्हा आपल्याला स्वतःबद्दल उत्तम भावना असतात तेव्हा आपण आपले अनावश्यक गुण ओळखू शकतो आणि त्यांचे परिवर्तन करू शकतो. आपली स्वतःबद्दल वाईट कल्पना असेल, आपण दोषपूर्ण, पापी आहोत, तर आध्यात्मिक मार्गावर प्रगति होण्यासाठी आपण योग्य प्रकारे तयार नसतो. आपल्याला समाधानाची गोष्ट ही आहे की हिंदु धर्म आपल्याला आश्वासन देतो की आपण पापी तर नाहीच, आपल्यापैकी प्रत्येक व्यक्ति निर्विवाद आध्यात्मिक सम्बोध व मोक्ष प्राप्तीच्या मार्गावर आहे.

“वृद्धावस्था आणि मृत्यु यांच्यापलिकडे एक पवित्र आत्मा आहे, जो बुभुक्षा, तृषा, आणि दुःख यांच्याही पलिकडे आहे. तो आहे आत्मा, जो मानवाचे चैतन्य आहे. दुसर्‍या व्यक्तीच्या डोळ्यात तुम्ही बघता तेव्हा तुम्हांस जो दिसतो, तो एक अमर्त्य, निर्भय आत्मा, तो परमेश्वर आहे.”

सामवेद, छान्दोग्य उपनिषद ८.७,३-४.