image

संपादकाच्या पीठावरून-

भयंकर ईश्वर/प्रेमळ ईश्वर

______________________

भक्तियोगाच्या माध्यमाने व्यक्त केलेले आपले ईश्वरावरचे प्रेम हा सर्व हिंदु पंथांचा ईश्वरपूजेचा पाया आहे.

______________________

सद्गुरु बोधिनाथ वैलाणस्वामी

Read this article in:
English |
Hindi |
Tamil |
Gujarati |
Spanish |
Russian |
Marathi |

अलिकडच्याच एका अध्यापनाच्या प्रवासात माझी रविन्द्रन्शी भेट झाली. त्याचे बालपण भारतात गेले होते परन्तु त्याचे पाश्चिमात्य देशांत अनेक वर्ष वास्तव्य होते. त्याने असे बोलून दाखवले की त्याच्या प्रदेशातल्या लोकांचा असा समज होता की त्याच्या खेड्याच्या देवदेवतांची नियमित आणि व्यवस्थित आराधना केली नाही तर त्या संतापित होतील आणि त्यामुळे लोकांच्या जीवनात नको त्या घटना होऊ लागतील. त्यामुळे ते पीढ्यांपीढ्या पूजा करत असलेल्या अनेक देवदेवतांचे प्रशमन करण्याच्या खटपटीत असायचे. या प्रकारच्या पूजेच्या मागे कल्पना आहे ती भीतिची, आपण आपल्या पूजेचे ऋण फेडले नाही तर आपल्याला काही तरी प्रकारे शिक्षा होईल आपल्याला दु:ख प्राप्त होईल ही.

मी रविन्द्रन्ला आश्वासन दिले की हिंदुधर्माचे देव संताप, दु:खी करण्यासाठी, तुमच्यावर निर्णायक उद्गार काढण्यासाठी, तुमच्यावर प्रतिकार करण्यासाठी किंवा क्षुद्रदृष्टीने बघण्यासाठी वास्तव्य करत नसतात. प्रेम आणि तेज हे त्यांचे रूप असून आपल्या चुकांकडे, कुरापतीकडे, आपल्या न केलेल्या कार्याकडे न बघता ते आपल्या प्रेमाचा वर्षाव आपल्यावर करत असतात. हिंदु धर्म हा आनंददायक मनोवृत्तीवर आधारित धर्म आहे. त्यांत परमेश्वराची कधीच भिती वाटण्याचे कारण नाही, आपण आपली पूजा अगदी पूर्णपणे केली नाही तर आपला अपराध होईल आणि परमेश्वर आपल्याला काहीतरी शिक्षा देईल असे कधीच वाटण्याचे कारण नाही. एका उच्च पातळीवर पूजा म्हणजे आपल्या ओतप्रोत प्रेमाचे प्रदर्शन आहे. परमेश्वर साक्षात प्रेम आणि फक्त प्रेमच आहे.

माझे गुरुदेव, शिवाय शुभ्रमुनीयस्वामी, यांनी असे स्पष्ट केले: विविध पाश्चात्य धर्मात प्राधान्य असलेल्या मानसिक उपाधींपासून मुक्त असलेला हिंदु धर्म हा एक आनंदमय धर्म आहे. द्रोही ईश्वराच्या कल्पनेपासून तो मुक्त आहे. एकच आध्यात्मिक मार्ग या कल्पनेपासूनही तो मुक्त आहे.

रविन्द्रन्ने मला त्यांच्या श्रद्धेबद्दल आणखी सांगितले. जेव्हा काही वाईट घटना घडल्या, उदाहरणार्थ, बालकाचा मृत्यु, पूर् किंवा अकस्मात आजार, की गावातील वाडवडील मंडळी, आपल्या पूजेत आपण काही दुर्लक्ष केल्यामुळे ह्या देवदेवता आपल्याला शिक्षा देत आहेत असले विचार करायचे, आपल्या आदेशित कर्मात काही कमी झाले काय याबद्दल चिकित्सा करायचे. रविन्द्रन्ची अशी आशा होती की परमेश्वराचे रुप आणखी चांगले समजले तर त्याला या अंधश्रद्धेवर विजय मिळविता येईल.

हिंदु तत्वज्ञान आपल्याला असे शिकवते की आपल्या जीवनांत होणार्या सर्व घटना, त्या उत्तम किंवा वाईट असोत, आपण आपल्या पूर्वायुष्यात केलेल्या कर्माची फळे आहेत. आपत्काल परिस्थिती येणे ही एक स्वतःच निर्माण केलेले दुर्भाग्य आहे, परमेश्वराने दिलेली शिक्षा नाही. द्वंद्वत्वाच्या वस्तुस्थितीतले आपले आयुष्य हे नैसर्गिक शक्तींचे क्रिडांगण आहे, जेथे शरीर धारण केलेल्या आत्म्यांना सुख दुःख, आनंद विषाद, यश अपयश, आरोग्य अनारोग्य, यांची अनुभूति येते. चैतन्याच्या सखोल मनोराज्यात राहणारे दैवी पुरुष या जीवांना संसारातून मार्ग काढण्यास मदत करायला नेहमी तयार असतात. पूजाविधी त्यांना संतुष्ट करण्यासाठी किंवा त्यांचा कोप शांतविण्यासाठी नसून त्यांची आराधना करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन मिळविण्यासाठी करण्यात येतात.

विधिपूर्वक केलेल्या शमनाचा एक शास्त्रीय दृष्टीने उद्देश आहे तो असा: शरीर धारण केलेल्या आत्म्यांच्या जीवनात उलथापालथ होऊ न देण्यासाठी आणि व्यतिरेकी शक्तींपासून संरक्षण करण्यासाठी. गुरुदेवांनी असा उपदेश दिला आहे की असल्या दुष्ट जीवांच्या प्रभावापासून संरक्षण करण्याचा अत्युत्तम उपाय आहे उच्च स्तरावरच्या अधिक शक्तिशाली जीवांचे-हिंदु धर्मातल्या देवदेवतांचे-आवाहन करून आपल्याभोवती आध्यात्मिक शक्तीचे एक क्षेत्र निर्माण करणे. जेथे सहचार, शौच आणि देवदेवतांशी सायुज्य असते तेथे हे व्यतिरेकी जीव असमर्थ असतात.

त्याच प्रवासात एका बालकाने उत्सुकतेने पुढे येऊन विचारले: “मी देवळातल्या सर्व देवांची पूजा करायला हवी की मी फक्त गणपतीवर केन्द्रित करू शकतो? माझ्या लक्ष्यात येत आहे की एकाग्र चित्ताने मी त्याच्या अधिक जवळ पोहोचतो आहे. श्रीगणेशाशी माझा संबंध इतर देवतांशी कधीहि न होऊ शकलेला असा संबंध होत आहे.”

मी या प्रश्नाचे होकारार्थ असे उत्तर दिले की एकाच देवतेवर चित्त एकाग्र करणे अगदी उचित आहे. खरे तर बहुतेक हिंदुधर्मीय लोक हाच मार्ग पत्करतात. तथापि, देवालयातल्या सर्व देवतांची उपस्थितीची जाणिव असणे आणि त्यांना वंदन करणे अत्यंत अर्थपूर्ण आहे. मी असे सुचवले: “दुसर्या देवतेच्या पूजेला उपस्थित असतांना मनःपूर्वक पूजन करावे आणि गहन आदर प्रदर्शित करावा, परन्तु श्री गणेशाशी सान्निध्य वाटण्याचा जो प्रयत्न असतो तो करण्याची आवश्यकता नाही.”

संस्कृत भाषेत स्वतःच्या अत्यंत धार्मिक मनाच्या एकाग्रतेने चिंतन केलेल्या देवतेला “इष्ट देवता” म्हणजे अक्षरशः “हृद्य किंवा निवडलेली देवता” म्हणतात. वैष्णव पंथीय लोक अनेक दैवी रूपांतून इष्ट देवता निवडू शकतात: विष्णु, बालाजी, कृष्ण, राधा, राम,लक्ष्मी, हनुमान, नरसिंह, आणि शाळीग्राम (गंडकी नदीत सापडत असलेला काळा दगड). स्मार्त लोक परंपरेने सहा देवतांपैकी एक निवडतात: शिव, शक्ति, विष्णु, सूर्य, गणेश, आणि कुमार (किंवा त्यांची परंपरागत रुपे). शाक्त लोक, जे शक्ति देवतेचे पूजन करतात, ते या देवतेच्या अनेक रूपापैकी एका रूपावर, क्रूर रूपाच्या कालीपासून तो सौम्य आणि लावण्यपूर्ण पार्वती किंवा अंबिका पर्यंत, चित्त एकाग्र करू शकतात. शैव पंथीय आपले चित्त प्रामुख्याने शिवाच्या शिवलिंगाच्या, नटराजाच्या, अर्धनारीश्वराच्या रूपावर एकाग्र करतात. अनेक शैव पंथीय कार्तिकेयाची, ज्याला मुरुगन किंवा स्कंद असेही म्हणतात, इष्ट देवता म्हणून निवड करतात. माझे गुरुदेव, एक पक्के शैव मुनि, यांनी आम्हाला “गणपती, जो ईश्वर भौतिक पातळीच्या सर्वात जवळ आहे, ज्याच्याशी आपल्याला अगदी सहज संपर्क साधता येतो आणि जो आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात आणि काळजीत मदत करू शकतो, त्याच्या पूजेने सुरुवात करून, शिवाची परम दैवत म्हणून पूजा करायला शिकविले.”

याची आपल्या मित्रांशी तुलना केल्यास हे समजायला मदत होईल. युवकांना अनेक मित्र असतात, पण सर्वात जवळचा मित्र, ज्याच्याशी आपण आपले वैयक्तिक, अत्यंत खासगी गोष्टी बोलू शकतो, असा सर्वसाधारणपणे एकच मित्र असतो. इष्टदेवता असणे हे ही त्याचप्रकारचे आहे आणि त्या देवतेबद्दलच्या आपल्या भावनाही आपल्या सर्वात जवळच्या मित्रासारख्याच असाव्यात. त्या देवतेवर चित्त एकाग्र केल्यास आपण त्या देवतेकडे अधिकाधिक जवळ जातो.

या देवतेचे करुणात्मक रुप समजून घेण्यासाठी आणि मनातली उरलीसुरली भीति घालवण्यासाठी त्या देवाला किंवा देवीला आपले पिता किंवा माता आहेत आणि आपण त्याचे अपत्य आहोत असे समजावे. खरे तर, ही इष्टदेवता अगदी अत्युत्तम पालक आहे, कारण आपण काहीही केले तरी ती आपल्याला तिचे आशीर्वाद आणि प्रेमच देत असते. जेव्हा आपण चूक करतो, तेव्हा ही इष्टदेवता कधीच क्रोध करत नाही किंवा आपल्याला शिक्षा देत नाही. या देवतेचे प्रेम सर्वकाळ, सर्व परिस्थितीत परिपूर्ण प्रेम असते. या देवतेच्या सान्निध्याच्या प्रगतीपथावर आपल्याला या प्रेमाची जाणिव होते आणि त्या प्रेमाच्या प्रकाशात आपण आनंदित होतो. तिरुमंतिरम् या ग्रंथात ही कल्पना या प्रकारे पक्की केली आहे: “अज्ञानी मूर्खपणे म्हणतात की शिव आणि प्रेम या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, परन्तु त्यांना कुणालाच हे माहित नसते की प्रेम हेच शिव आहे. जेव्हा प्रेम आणि शिव एकच आहेत असे मनुष्याला समजते तेव्हा ते अमृत होतात.”

परमेश्वराच्या प्रेमाचे वर्णन करतांना मी नेहमी वैष्णव आणि शैव कल्पनांच्या साम्याचे वर्णन देतो. वैष्णवांच्या चैतन्य पंथात, उदाहरणार्थ, भक्ति हा पाच पायर्यांचा मार्ग आहे असे मानले जाते: परमेश्वराबद्दल ताटस्थ्य, परमेश्वराचे दास्य, परमेश्वराशी मैत्री, परमेश्वराबद्दल मातृत्व/पितृत्व भावना, आणि शेवटी परमेश्वर म्हणजे आपला प्रेमी. शैव पंथातही अशीच समांतर कल्पना आहे. पहिल्या पायरीला दास मार्ग म्हणतात, ज्यात परमेश्वर आणि भक्त यांचे नाते स्वामी आणि परिचारक असे असते. दुसर्या पायरीवर, सत्पुत्र मार्गावर, हे नाते मूल आणि माता/पिता यांचे असते. तिसर्या पायरीवर, सखा मार्गावर, परमेश्वर एका मित्रासारखा असतो. चौथ्या प्रौढीच्या पायरीला सन्मार्ग किंवा खरा मार्ग म्हणतात. परमेश्वर हा आपला सर्वात जवळचा प्रेमी आहे. दोन्ही पंथ भक्तिमार्गाच्या या पायर्यांनी आत्म्याने उत्तरोत्तर परमेश्वराजवळ जाण्यावर भर देतात. याप्रमाणे भक्ताचे परमेश्वराबद्दलचे प्रेम तीव्र होते. भक्तिच्या सर्वसाधारण साधना आहेत:

श्रवण: पवित्र ग्रंथ आणि परमेश्वराबद्दल कथा ऎकणे.
कीर्तन: भक्तिपर ऋचा आणि भक्तिगीते गाणे.
स्मरण: परमेश्वराच्या अस्तित्वाची आणि नावाची आठवण ठेवणे. मंत्रजपाचा यात समावेश होतो.
पादसेवन: परमेश्वराच्या पायाची सेवा करणे, यांत जनसेवेचा समावेश होतो.
अर्चना: देवळात पूजेला उपस्थित राहणे किंवा स्वतःच्या घरातल्या देवघरात देवाची पूजा करणे.
वंदन: देवतेला प्रणिपात करणे.
आत्मनिवेदन: परमेश्वराला पूर्णपणे शरण जाणे.

भक्तिमार्गाचे पालन केल्याने प्रेम, नि:स्वार्थ, शुद्धता, जेणेकरून स्वतःची जाणिव कमी होणे आणि परमेश्वराला शरण जाणे हे गुण प्राप्त होतात. प्रपत्तिच्या या कल्पनेत या सर्व पंथांची एकात्मता होते. आपण प्रपत्ति प्राप्त केली आहे हे आपल्याला तेव्हा कळते जेव्हा आपल्याला विनाप्रयास कळून चुकते की जे काही घडते ते परमेश्वराच्या कृपेने होते, केवळ आपल्या कर्तृत्वामुळे नाही. या प्रकारच्या पूजनात भीतिचा अंशही नसतो.

आमचे परमगुरु, योगस्वामी (१८७२-१९६४), यांनी एका युवकाला लिहिलेल्या पत्रात एकात्मतेचा दृष्टिकोन केवळ परमेश्वराच्या बाबतीतच नव्हे तर सर्व सृष्टीसाठीच हवा हे समजावून सांगितले आहे ते असे: “मी तुझ्याबरोबर आहे आणि तू माझ्याबरोबर आहे. आपल्या दोघांत काहीच फरक नाही. मी तू आहे. तू मी आहे. मग कशाला भ्यायचे? हे बघ! माझे अस्तित्व तू आहे. मग तू काय करावे? तू प्रेम करावे. कोणावर? सर्वांवर. आणखी स्पष्ट शब्दात सांगायचे म्हणजे, तूझे खरे नैसर्गिक रूपच प्रेम हे आहे. तूच नाही तर सर्वच प्रेमाने विस्तारित आहेत. तथापि, “सर्व” अस्तित्वात नाहीच, कारण फक्त तूच अस्तित्वात आहे. सर्व तूच आहे!”

॥ ॐ नमः शिवाय ॥