वाईट घटनांना तोंड देणे

चांगल्या लोकांच्या आयुष्यात वाईट घटना होणे यांवर मनन करून जीवनातील कठीण परिस्थितींना सहज आशावादी मनोवृत्तीने तोंड देण्यासाठी काही सूचक मार्गदर्शन

सद्गुरु बोधीनाथ वैलाणस्वामी

English |
Tamil |
Marathi |
Kannada |
Spanish |
Hindi |

आपल्या जीवनात नव्यानेच घडलेल्या वाईट घटनांचा स्वीकार न करण्यार्‍या अनेक हिंदु लोकांना गेल्या काही वर्षात भेटलेलो आहे. ते आर्ततेने म्हणतात, “आमच्या कुटुंबाने आपले जीवन अत्यंत सद्गुणी आणि कर्तव्यनिष्ठ पध्दतीने घालवलेले आहे आणि त्यामुळे ह्या एक सत्याने आमच्या जीवनात वाईट गोष्टी होण्यापासून आम्हाला दूर ठेवावे असे आम्हाला वाटते.” अत्यंत कठीण परिस्थितीत “परमेश्वराने हे कसे होऊ दिले?” या प्रश्नाचे उत्तर देता नाही आले म्हणून त्यांची श्रद्धा हादरून गेलेली होती. त्यांच्या या द्विधा मनःस्थितीला माझे उत्तर, खाली वर्णन केल्याप्रमाणे “कर्म” या हिंदु धर्मातल्या महत्वाच्या कल्पनेच्या आधारे, देत आहे.

कर्म: “काम”, “कार्य” (मराठी वाचकांना या शब्दाची व्याख्या देण्याची आवश्यकता आहे असे या भाषांतरकाराला वाटत नाही.) हिंदु धर्मातील सिध्दांतापैकी एक महत्वाचा सिध्दांत “कर्म” हा १) एखाद्या कार्याला, २) कारण आणि त्याचा परिणाम या सिध्दांताला किंवा ३) कर्मफळाला किंवा उत्तरफळाला जे कर्त्याला पुढे कधी मिळते याला उद्देशून आहे. आपण जे पेरतो, त्याचेच फळ आपल्याला या किंवा पुढच्या जन्मी मिळते. स्वार्थी, द्वेषपूर्ण कार्य (पापकर्म अथवा कुकर्म) यांचे फळ दुःख आणते. परोपकारी कामे (पुण्यकर्म किंवा सुकर्म) प्रेमळ प्रतिक्रिया निर्माण करतात. कर्म हा आपल्या अंतरविश्वाचा स्वयंप्रचलित तटस्थ नियम आहे, जसे गुरुत्वाकर्षण हा बाह्य विश्वाचा व्यक्तिनिरपेक्ष नियम आहे.

काही धर्म असे शिकवितात की परमेश्वर आपल्या कर्माप्रमाणे त्याचा पुरस्कार किंवा शिक्षा देतो. हिंदु धर्म, तथापि, असे समजावून सांगतो की हे सर्व कर्माच्या सिध्दांताने हाताळले जाते. मला कर्माची तुलना संगणकाच्या संविधीशी किंवा संगणकावरच्या खेळाशी (computer program or computer game) करायला आवडते. परमेश्वराने एक संविधी तयार करून या विश्वावर स्थापन केला. या संविधीत मानवाची शक्य असलेली सर्व कर्मे आणि त्यांची फळे समावित आहेत.

आपल्या पूर्वजन्माच्या कर्मांनी त्यांची कर्मफळे निर्माण केली आहेत, त्यापैकी काही आपल्याला या जन्मात भोगावी लागणार आहेत. जणु काही आपल्यात एक चुंबक आहे, जो या चांगल्या आणि वाईट दोन्ही अनुभवांना आपल्याकडे आकर्षित करत असतो. एक उत्तम, धार्मिक जीवन पूर्वजन्मात निर्माण केलेल्या वाईट कर्मफळांना पूर्णपणे नष्ट करण्यास पुरेसे नसते. तरीसुध्दा निस्वार्थी सेवा केल्याने अजून न अनुभवलेल्या कर्मफळांची तीव्रता कमी करणे त्या आधीच शक्य असते.

आपण जेव्हा वाईट घटनांची योग्यता मान्य करत नाही तेव्हा आपण अस्वस्थ आणि व्याकुळ होतो. याने आपली मोठी मानसिक भूमि व्यापून टाकल्या जाते. या उलट अशी घटना स्वयंनिर्मित आहे हे मान्य केले तर ही अस्वस्थता आणि व्याकुळता हळु हळु नष्ट होते.

वाईट घटनांवर एक सामान्य प्रतिसाद असतो तो त्यांत भाग घेतलेल्या लोकांवर आपले लक्ष्य केन्द्रित करण्याचा. त्या लोकांवर संतप्त होणे आणि शक्यतो त्यांच्यावर सूड उगवण्याचा कट करणे हा मानवी स्वभाव आहे. असले प्रत्युत्तर मानसिक आतंक वाढवतो, आणि त्याच वेळी आपल्या कर्माचेच फळ भोगणे आपल्या नशिबात होते हा मुख्य मुद्दा आपण विसरून गेलो असतो. त्या लोकांनी तुम्हाला याप्रमाणे वाईट वागविले नसते तर भविष्यकाळात इतर तुम्हाला तसे वागवतील. कर्म हे गुरुत्वाकर्षणासारखे कधीहि न असफल होणारे तत्त्व आहे; ते पूर्णपणे कधीच टाळता येत नाही.

माझे गुरु, शिवाय शुभ्रमुनीयस्वामी, इतरांना दोष देण्याविरुध्द खडसावून बोलले: “प्रत्येक वेळी तुम्हाला जे होते त्याबद्दल तुम्ही दुसर्‍याला दोष देता किंवा कुठल्याही प्रकारे दोष देता, तेव्हा स्वतःला सांगा की “ज्याला तोंड द्यायला माझा जन्म झाला ते हे माझे कर्म आहे. मला जे होते त्याबद्दल दुसर्‍यांना दोष देण्यासाठी मी या भौतिक शरीरात जन्म घेतला नाही. आपल्या कर्माला तोंड न देऊ शकणार्‍या अज्ञानी अवस्थेत माझा जन्म झाला नाही. या आणि पूर्वजन्मांचे कर्म स्वीकार करण्यासाठी आणि ते व्यवस्थित आणि अद्भूत प्रकारे हाताळण्यासाठी, आध्यात्मिक उन्मीलनासाठी माझा येथे जन्म झाला आहे.”

दुसर्‍यांना दोष न देणे ही पहिली पायरी आहे. ज्यांनी तुम्हाला नीट वागविले नाही त्यांच्याबद्द्लच्या मनातल्या कठोर भावना मिटवून टाकण्यासाठी “तिरुकुरल” या ग्रंथातला उच्च मनोवृत्तीचा हितोपदेश पाळू शकता: “तुम्ही जर तुम्हाला झालेल्या अपकाराला दयाळूपणे प्रतिसाद दिला आणि दोन्हींचे विस्मरण केले तर ज्यांनी तुम्हाला दुखविले त्यांना त्यांच्याच लज्जेच्या रुपाने शिक्षा मिळेल.”

कर्माचे अनिष्ट फळ मिळण्याचे पात्र झाल्याने आपल्याला या अनुभवापासून काही शिकण्याची संधि देते. आपण पूर्वी लोकांना जसे वागविले असते तसेच ते आपल्याला वागवत असतात. आपण जर आपल्या उद्योगातल्या भागीदाराला फसवून त्याचे पैसे लुबाडले असतील तर कधीतरी आपल्यालाही तोच अनुभव येईल- ताबडतोब नाही, पण कालावधीने. हे कर्मफल, ज्याला तरूण पीढी “शिक्षा” म्हणतील, ते आपण दुसर्‍यांना वाईट वागवल्याने त्यांनी जे अनुभवले तेच आपल्याला अनुभवायला भाग पाडते. अशी जाणीव अतिशय अस्वस्थ करणारी असू शकते आणि पुन्हा कधीहि दुसर्‍याला फसविण्यापासून परावृत्त करू शकते. याप्रमाणे कर्म हा आपला गुरु आहे. आपल्या वर्तणूकीच्या परिणाम काय असू शकतो हे आपल्याला नीट शिकवतो, आणि आपण जर सतर्क असलो तर आपली वर्तणूक सुधारित करण्यास शिकवतो.

आपल्या अनुभवापासून शिकण्याबद्दल गुरुदेव म्हणाले: “जीवनाचे मूळ नियम इतके सोपे आहेत की अनेक लोक त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत. का? कारण सर्वसाधारणपणे या परिक्षांमध्ये अनुत्तीर्ण होण्यासाठी आपल्याला इतक्या अनेक संधि मिळत असतात की आपण या मिळालेल्या धड्यांकडे लक्ष न देण्यासाठी उत्तम कारणे निर्माण करतो. काही परिक्षांमध्ये अपयश मिळणे साहाजिकच आहे असे आपण म्हणू शकतो काय? होय, हे शाळेत एखाद्या विषयात नापास होण्यासारखेच, काही परिक्षांमध्ये अनुत्तीर्ण होण्यासारखे आणि पुन्हा तोच विषय घ्यायला लागण्यासारखेच आहे की नाही? आपण आपल्या अनुभवापासून शिकलेच पाहिजे, नाहीतर आपण तेच पुनःपुन्हा अनुभवू.”

हिंदु लोक मला अधिक एक प्रश्न विचारतात की या जगात एवढा हिंसाचार का आहे? या प्रश्नाचे अत्यंत रूप हे आहे: “या जगात एवढा हिंसाचार आहे की परमेश्वराचे अस्तित्वच कसे शक्य आहे?”

विकिपेडियाच्या “सुरु असलेल्या सशस्त्र संघर्षांची यादी” या पृष्ठावर लघु, मध्यम आणि विशाल अशा ६० चालू असलेले संघर्ष नमूद केले आहेत. या सशस्त्र संघर्षांच्या कारणाचा परमेश्वराशी काहीही संबंध नाही. त्यांचा संबंध सर्वशः मानवाच्या वागण्याशी आहे. दुर्दैवाने अजूनही या पृथ्वीवर बराच “जातीयवाद” आहे. याची व्याख्या अशी आहे की “जातीची जाणीव आणि निष्ठा, विशेषेकरून इतर गटांपेक्षा आपली जात उच्च पातळीची आहे असे समजणे.” दुसर्‍या शब्दांत सांगायचे म्हणजे संघर्षात असलेल्या लोकांची आपले स्वतःचे विश्वास, संस्कृति, भाषा, इत्यादींचा इतरांनी अनुसरण करावे अशी मागणी असते. इतरांच्या जीवन पध्दतीबद्दल ही असहिष्णुता आहे.

याच्या विरुध्द, अनेक देश आज त्यांच्या बहुत्वाबद्दल प्रसिध्द आहेत, ज्याची व्याख्या अशी करता येते: “एक राज्य किंवा समाज, ज्यांत विविध अन्य-भिन्न-देशीय, जातीय, धार्मिक किंवा सामाजिक गटांचे सदस्य आपले पारंपारिक संस्कृति आणि विशेष हितसंबंध एका सर्वसामान्य संस्कृतीच्या परिसीमेत वृध्दिंगत करतात.”

माझा असा उपदेश आहे की हिंसाचार आणि युध्दसंघर्ष यांचा परमेश्वराशी काहीही संबंध नाही अशी दृष्टि ठेवावी; ते (हिंसाचार आणि युध्दसंघर्ष) जातीयवादावर विश्वास कायम केल्याने उत्पन्न होतात. अशी दृष्टि आपण रोज बघत असलेल्या अति दुःखकारक प्रकारामुळे केलेल्या मानसिक अस्वस्थतेला दूर करू शकते. माझ्या गुरुजींनी असे शिकविले: “प्रथम असा दृष्टिकोन प्राप्त करा की हे जग अद्भूत आहे, या जगात काहीच चूक नाही.”

आपल्या जीवनातल्या कठीण परिस्थितीला तोंड देण्यासाठी आणखी दोन हिंदु दृष्टिकोन मदत करू शकतात: १) काही व्यक्ति दुष्ट आणि काही व्यक्ति सज्जन असतात हे हिंदु धर्मीय मान्य करत नाहीत. हिंदु लोक मानत्तात की प्रत्येक व्यक्ति हा एक आत्मा, एक दैवी सजीव प्राणी आहे, जो स्वभावतः चांगला आहे. २) हे सर्व जग एक कुटुम्ब आहे.

या जगात बहुतेक सर्व कुटुम्बीय मनोवृत्तीचे असतात. आपल्या सर्व कुटुम्बीयांना लाभ होईल हेच बहुतांश मानवी कष्टाचे ध्येय असते. त्यांनी सुखी, आनंदी, आणि धार्मिकदृष्ट्या समाधानी राहावे असे आपल्याला हवे असते. जेव्हा आपण सर्व जग हे एक कुटुम्ब असे परिभाषित करतो तेव्हा आपण जगात सर्वांना सुखी आणि समाधानी इच्छितो.

शेवटी निष्कर्ष असा की वाईट घटना कश्चितही पराभूत न होणार्‍या या कर्माच्या नियमामुळे आपल्या या जन्माच्या आणि पूर्व जन्माच्या कर्मांनी आकर्षित केलेल्या कर्मफलामुळे आपल्या आयुष्यात होत राहतील, परन्तु या घटना आपली अस्वस्थता, विमनस्कता, परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दल शंका आणि दुसर्‍यांना दोष देणे यांचा उगम होऊ नये. खरे तर आपण त्यांना आपले स्वयंनिर्मित कर्म म्हणून स्वीकार करू शकतो आणि जीवनाच्या कठीण परिस्थितीपासून बोध घेऊन ह्या चक्राची पुनरावृत्ति टाळतो.

आणि जगाच्या दृष्टीने आपण असे मान्य करतो की जे काही होत आहे ते जगात उरलेला जातीयवाद संपवून टाकण्याचा प्रयत्न जशी सामुदायिक जाणीव हळु हळु विश्व बहुत्वाकडे हलते त्यासाठी होत आहे; आपण स्वतः दूरदृष्टीने सर्व लोकांच्या देवत्वाची आणि सर्व जग एक कुटुम्ब असल्याची आपली हिंदु श्रध्दा लोकांसोबत अनुभवावी.

अयं बन्धुरयं नेति गणना लघुचेतसाम् ।
उदारचरितानां तु वसुधैव कुटुम्बकम् ॥

अर्थ: केवळ अल्पबुध्दीचे लोक भेदभाव करतात की: “एक माझा नातलग आहे, दुसरा परका, तिर्‍हाईत आहे.” परन्तु, जे उदारचरित मनाने जगतात त्यांच्यासाठी हे संपूर्ण विश्व केवळ एकच कुटुम्ब आहे.

महा उपनिषद, अध्याय ६, श्लोक ७२.