English |
Tamil |
Kannada |
Hindi |
Spanish |
Portuguese |
Marathi |

सार्वलौकिक अशा या जगात आपला धर्म पुढच्या पीढीला देण्याच्या गरजेबद्दल लोक आता प्रश्न विचारताहेत. त्याबद्दल बोलूया.

सद्गुरु बोधिनाथ वैलाणस्वामी

हजारो वर्षापासून धार्मिक मातापित्यांची आपला धर्म आपल्या आपत्त्यांना देण्याची प्रथा चालू आहे. आपल्या धर्माच्या समाजात आपल्या मुलांनी सामील व्हावे अशी आईवडिलांची सर्वसामान्य इच्छा असते. आता काळ बदलेला आहे. आजकाल बहुसंख्यी आईवडिल स्वतःला आध्यात्मिक, परन्तु कुठल्याही धर्माशी संबंध नाही असे मानतात. बरेच धर्मनिरपेक्ष मानवतावाद अवलंबितात. इतर आपल्या मुलांनी धार्मिक कार्यात किंवा शिक्षणात भाग घेण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांना धर्मनिरपेक्ष शिक्षण देण्याकडे आपले लक्ष्य केंद्रित करतात, कारण धर्माला त्यांच्या प्रगतिपटावर काही किंमत नाही असे त्यांचे मत असते. काही लोक तर निव्वळ धर्माला विरोध करणारे असतात. भिन्न धर्मीयांचे विवाहसंबंध आता, विशेषतः पाश्चात्य जगतात, सर्वसामान्य झालेले आहेत. अलिकडे मी असे ऐकले आहे की काही आईवडिल, प्रत्येक व्यक्तीने आपली आध्यात्मिक वाटचाल स्वतःच शोधायची असते असा विचार करून, आपल्याला आपल्या मुलांनी आपलाच धर्म आणि रितिरिवाजांचा स्वीकार करायला सांगण्याचा नैतिक अधिकार आपल्याला आहे काय असा प्रश्न सुध्दा विचारित आहेत.

आणि त्यानंतर त्यामागे काही व्यावहारिक कारणमिमांसा आहे: घरी धर्माचे शिक्षण द्यायला अति कामामुळे वेळच नाही, स्वतःलाच धर्माचे पुरेसे ज्ञान नाही, नियमितपणे धार्मिक कार्याला उपस्थित न राहणे, स्वतःच्या धर्माचा अभिमान नसणे, आणि आपल्या मुलांनी आंतरराष्ट्रीय विद्यालयांत नीटपणे मिसळून जाणे, अशी.

आपल्या मुलांना घरी धर्माचे शिक्षण न देण्याचे ठरवलेल्या मातापित्यांनी आपल्या पुढच्या पीढीला उत्तम वर्तणुक आणि त्यांचे कुटुम्ब आणि समाज यांच्यासाठी असलेले कर्तव्य यांचे शिक्षण कसे मिळेल याचा गंभीरपणे विचार करावा. संकेतस्थळांवर, मुलांना वेळ दिल्यास ते आपली वर्तणुक आणि कर्तव्य काय असावेत ते समजू शकतील, अशाप्रकारची विधाने आपल्याला आढळून येतात. तथापि, शिक्षकवर्गाला यावर घोर असंम्मति दाखवण्यासाठी पुरेसा स्वतःचा अनुभव आहे. त्यांनी माझ्याकडे त्यांची नाराजी व्यक्त केली आहे की त्यांचे अनेक विद्यार्थी आपल्या वर्गात पुढे जाण्यासाठी नियमितपणे फसवेगिरी करतात. त्यांना केवळ जिंकणे महत्वाचे आहे, प्रामाणिकतेचे महत्व कमी आहे.

नैतिक शिक्षणासाठी निधर्मी मार्ग आहेत काय? “सकारात्मक मानसशास्त्र” हे एक उदाहरण आहे. मूल्य आणि कर्तव्य यांच्या अभ्यासाठी व्यापक उपक्रम असल्यामुळे मानाचे स्थान मिळविलेल्या या मानसशास्त्राने चारित्र्याचे चोवीस प्रकारच्या गुणसामर्थ्याचे वर्णन असे दिले आहे: “मानवाचा चांगुलपणा प्रदर्शित करणारे मानसशास्त्रीय घटक असलेले, आणि ते एका मोठ्या कुशलतेच्या जीवनाचा विकास करण्याचे मार्ग असतात. पाहा: www.viacharacter.org/character-strengths-via.

मुलांना धर्म कसे शिकवीत आहेत याचा एक अभ्यास

धर्माचे शिक्षण कसे देण्यात येत आहे हे समजून घेण्यासाठी इ.स. २०१९ मध्ये प्रकाशित झालेल्या प्राध्यापक ख्रिश्चन् स्मिथ यांनी ब्रिजेट् रिट्झ आणि मायकल् रोटोलो यांच्याबरोबर हिंदु व बौध्द धर्मांसकट विविध धर्मांच्या शेकडो व्यक्तींच्या मुलाखती घेऊन लिहिलेल्या धार्मिक पालकत्व: समकालीन अमेरिकेत श्रध्दा आणि मूल्य यांचे प्रसरण (Religious Parenting: Transmitting Faith and Values in Contemporary America) या ग्रंथाकडे बघू या. त्यांना असे आढळून आले की प्रचंड विविधता असून देखील मुलांच्या धार्मिक सामाजिकतेसाठी ते जवळजवळ एकच पध्दत वापरतात. त्या सर्वांसाठीच जीवनयात्रेत आपण एक अत्युत्तम व्यक्ति होण्यासाठी धर्म महत्वाचा आहे कारण धर्म या अशा जीवनाचा पायवा पुरवतो.

छोट्या प्रमाणावर आम्ही आशिया खंडातील हिंदु आईवडिलांमध्ये चौकशी केली आणि तेव्हा असे दिसून आले की त्यापैकी अनेकांचा असाच दृष्टिकोन आहे: श्रध्देचे शिक्षण चारित्र्य घडवते आणि त्यांच्या मुलांना जीवनाची आह्वाने आत्मविश्वासाने आणि प्रभावी रीतीने हाताळण्यास मदत करते. त्या आईवडिलांनी मला असे सांगितले की धर्म पतंगाच्या दोर्‍यासारखा असतो, तो या व्यक्तींना पृथ्वीवरच्या वस्तुस्थितीत एकत्र धरून ठेवतो आणि त्यांना विस्मृतीच्या अवस्थेत भरकटत जाण्यापासून वाचवतो. एका आईवडिलांनी असे सांगितले की गेल्या अनेक शतकांत हिंदु धर्माला जया संकटांना तोंड द्यावे लागले ते शिकल्यामुळे हिंदु धर्म किती थोर आहे हे त्यांना समजते; त्याचा नाश होऊ शकत नाही. माझ्या मते पुढच्या पीढीला हिंदु धर्म मोठे महत्वपूर्ण फायदे करून देऊ शकतो आणि त्याकडे दुर्लक्ष व्हायला नको. त्यापैकी तीन फायद्यांचे परिक्षण करु या.

चिरकालीन सुख मिळविणे

सहाजिकच आईवडिल आपली अपत्ये यशस्वी व्हावी यावर आपले चित्त केंद्रित करून त्यांचे संगोपन करीत असतात. पुष्कळ लोकांसाठी यश म्हणजे केवळ भौतिक समृध्दि असते, जी भरपूर पगार असलेल्या आणि फार कौशल्याची आवश्यकता असलेल्या नोकरीचा पाठपुरावा केल्याने मिळते. अर्थातच या युक्तीत तितक्याच सुशिक्षित आणि सामाजिक स्थरावर असलेला/असलेली जोडीदार मिळवणे याचाही समावेश असतो. यशाची ही परिभाषा एका महत्वाच्या अंगाकडे दुर्लक्ष करते- आनंदी असणे. मी अनेक स्त्रीपुरुषांना भेटलो आहे ज्यांना असे वाटत होते की व्यवसायातले यश आणि आर्थिक समृध्दि त्यांचे जीवन सुखी करेल, परन्तु तसे झाले नाही. हिंदु धर्म आपल्याला असे शिकवतो की चिरकालीन सुख आपण या भौतिक जगात काय मिळवतो त्यातून प्राप्त होत नाही. त्या प्रकारचे सुखसमाधान क्षणभंगुर आहे. जे काही मिळवले असेल ते गमावले जाऊ शकते. चिरकालीन सुख आपल्या आध्यामिक अंतरात्म्याच्या स्वाभाविक स्थितीत स्थिर होण्याने मिळते. माझे गुरु, शिवाय शुभ्रमुनीयस्वामी, यांनी हे असे व्यक्त केले: “सुख मिळविण्याचा प्रयत्न करतांना सुखी राहणे शिका, इतरांपासून नव्हे तर स्वतःच्या आत्म्याच्या गूढतेपासून. हे मिळविण्यासाठी त्यांनी असे शिकवले: “इतरांच्या चेहर्‍यावर स्मीत आणा. इतरांना सुखी करून स्वतःचे सुख आणि उत्तम मानसिक स्थिति प्राप्त करा.” त्यांना ज्ञात होते की समाधान हे दान देण्यामुळे मिळते, घेण्याने नाही.

क्रोधाचे नियंत्रण करणे

आपल्या जीवन गुणवत्तेचा नाश करण्यार्‍या क्रोधासारख्या फारच थोड्या गोष्टी आहेत. म्हणून या नकारात्मक भावनेचे कमीतकमी प्रदर्शन करणे आणि सरतेशेवटी ती नष्ट करणे हे महत्वाचे आहे. कर्माच्या नियमाचा सखोल अर्थबोध आपल्याला हे मान्य करू देतो की आपल्या आयुष्यात जे होत आहे ते व्हायलाच पाहिजे आणि त्याबद्दल क्रोध करायला नको. आपण हे मान्य करतो की आपण जे अनुभवितो आहे ते आपल्या कर्मातच आहे, चांगले किंवा वाईट. आपल्या आयुष्यात जे होत आहे ते आपल्याच या आणि पूर्वजन्मीच्या कर्मांचे फळ आहे.

मानसिक ताण कमी करणे

हिंदु बालबालिकांना शाळेच्या महत्वाच्या परिक्षांच्या मानसिक तणावाला अगदी लहानपणी वयाच्या आठव्या वर्षापासून तोंड द्यावे लागते. या तणावामुळे ते त्यांचे काम अत्युत्तम प्रकारे करू शकत नाहीत किंवा शिकू शकत नाहीत. हटयोगाची आसने दर आठवड्याला नियमितपणे केली तर त्यांत आपली मज्जासंस्था समतोल ठेवण्याची क्षमता आहे. त्यासाठी दुसरा उपाय आहे पोटाच्या पटलाद्वारे श्वासोचछ्वास (diaphragmatic breathing) करणे. त्याच्यामागची मूळ कल्पना आहे ती छातीऐवजी पोटाच्या पडद्याने श्वासोचछ्वास करायचा. हा एक नैसर्गिक मार्ग आहे. तान्ही मुले असाच श्वासोचछ्वास करतात. तथापि, आपण जेव्हा जीवनातील तणावांना सामील जातो तेव्हा पोटाचा पडदा आवळून जातो आणि श्वासोचछ्वास करतांना आपण आपली छाती फुगवतो. पोटातील हा पडदा मणीपूर चक्राच्या (solar plexus) खाली, जिथे बरगड्या वेगळ्या होतात त्या ठिकाणी असल्याचे आपण बघू शकतो. त्याची जागा ठरवण्यासाठी आपल्या हाताची बोटे त्या पटलावर ठेवा आणि खोकला. जेव्हा तुमची बोटे नेमकी त्या पटलावर असतील तेव्हा खोकलतांना ती उडतील. जेव्हाजेव्हा तुम्हाला शांत होणे आवश्यक असते तेव्हातेव्हा, जसे एखाद्या महत्वाच्या बैठकीच्या किंवा परिक्षेच्या आधी (आणि ती चालू असतांना सुध्दा), एक मिनिट पटलाद्वारे श्वासोचछ्वास करा. असे काही वेळा केल्याने तुम्हाला प्राणायामाची आपल्या मज्जासंस्थेवरचा तणाव कमी करण्याच्या शक्तीची खात्री होईल. हे साधन तुम्ही विविध परिस्थितीत वापरू शकाल.

ही तीन उदाहरणे असे स्पष्ट दाखवतात की हिंदु धर्मातील श्रध्दा आणि अनुष्ठाने आपल्याला एक अधिक सुखी, निर्मितीक्षम आणि यशस्वी जीवन जगण्यासाठी मदत करण्यास योजिलेल्या आहेत.

आमच्या अनौपचारिक सर्वेक्षणात भाग घेणार्‍या एका व्यक्तीचे वक्तव्य ऐका: “धर्माचा अभ्यास करणे अत्यंत महत्वाचे आहे, विशेषतः आजकाल आपल्या मुलांना ज्या प्रकारच्या आह्वानांना तोंड द्यावे लागते त्यामुळे. वारंवार हिंदु धर्माकडे विधीवादी असा पाहण्याचा संकुचित दृष्टिकोन असतो. हिंदु धर्माकडे पूर्णत्वाने पाहण्यास आणि तो कसा संपूर्ण मानव जीवनाला त्याच्या सर्व बाजूंनी- तत्त्वज्ञान, योग, आयुर्वेद, मानवी मूल्ये, पूजाविधी, वास्तु, ज्योतिष्य, आणि संस्कृति या बाजूंनी एकत्र करून घेतो, असे पाहण्यास अनेक लोक अपयशी होतात. मला खात्री आहे की जर हिंदु लोकांना त्यांचा धर्म किती परिणामी हितकर आहे याची जाणीव होईल तर ते आपल्या मुलांना आपला धर्म शिकवायला किंवा त्यांना धार्मिक शिक्षणासाठी पाठवण्यास आनंदाने तयार होतील.

ह्या अग्रलेखाचा शेवट करण्यासाठी माझ्या गुरुदेवांनी केलेल्या एका निर्भय सद्बुध्दीच्या वक्तव्याशिवाय दुसरा चांगला मार्ग नाही. एकदा शैव हिंदु श्रोत्यांसमोर भाषण देतांना ते म्हणाले: “होय्, आपले एक कर्तव्य आहे: आपल्या धर्माचे पुढच्या पीढीकडे, त्याच्या पुढच्या आणि त्याच्या पुढच्या पीढीकडे हस्तांतरण करणे. हे कसे करण्यात येईल? शैव शिक्षणाच्या माध्यमातून, अधिक विद्यालये बांधून. आपण आपल्या तरूण मंडळींना नीट शिक्षण द्यायला हवेच. त्याला पर्याय आहे तो म्हणजे नास्तिकतेला, ख्रिस्त धर्माला, मुस्लीम धर्माला, अस्तित्ववादाला आणि पाश्चात्य बुध्दिप्रामाण्यवादाला, भौतिकवादाला आणि धर्मनिरपेक्ष मानवतावादाला, त्याचप्रमाणे उदारमतवादी नव-भारतीय स्वयंसिध्दान्तांना, जे परंपरांचे मूळ तोडून टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत, यांना शैव पंथावर विजयी होऊ देणे हा. शिकण्यासाठी मोकळी आणि उत्सुक असलेल्या तरूण मनांना, परन्तु ज्यांच्यावर त्यांच्या परंपरेपासून दूर जाण्यासाठी भुरळ पाडण्यात येत आहे अशा, शिक्षण द्यावे यातच आपल्याला आशा आहे. त्यांना जवळ धरा, त्यांचे रक्षण करा, त्यांच्यावर खूप प्रेम करा आणि त्यांना शैव पंथाची धार्मिक संपत्ति द्या. हे सर्वश्रेष्ठ योगदान तुम्ही त्यांना देऊ शकता. बाकी सर्व नष्ट होतील. बाकी सर्व कुजतील.”

—ॐ—