दहा मिनिटांचा एक नेमधर्म

image

संपादकाच्या पीठावरून-

दहा मिनिटांचा एक नेमधर्म

______________________

आजच्या धकाधकीच्या जीवनांत आत्मनिरूपणासाठी थोडाही वेळ नसलेल्या लोकांसाठी एक संक्षिप्त आचार

______________________

सद्गुरु बोधीनाथ वैलाणस्वामी

Read this article in:
English |
Italian |
Marathi |
Hindi |
imageसद्यकाळात रोज शारिरिक व्यायाम करण्याची कल्पना सर्वत्र पसरली आहे. सफल, समाधानकारक जीवनासाठी सुदृढ, निरोगी प्रकृति असणे आवश्यक आहे याची सगळ्यांनाच जाणीव आहे. तीन प्रकारच्या परिणामासाठी व्यायाम सुचविण्यात येतो: क्षांति, लवचिकता आणि शक्ति. या प्रत्येकाचे विशिष्ट फायदे आहेत. चालणे, धावणे, पोहणे या सारख्या क्षांतिवर्धक व्यायामांनी आपले शारिरिक औजस्याची वृद्धि होऊन आपले हृदय, फुप्फुसे आणि रक्तप्रवाह नियंत्रण निरोगी राहतात. हटयोग, ताई ची, आणि नृत्य या सारखा व्यायाम आपले स्नायु शिथिल ठेवतो आणि आपल्या शरिरातल्या संधी चलनशील ठेवतो. शक्तिवर्धक व्यायाम आपल्या स्नायूंची वाढ करतात आणि आपले अस्थिपंजर दृढ करतात. यांत उपकरणरहित शारिरिक व्यायाम, वजन किंवा विरोधी जोर लावावा लागेल अशा प्रकारचे प्रयोग आणि पायर्‍या चढून जाणे यांचा समावेश होतो.

आपल्या शरिराची काळजी घेणे आवश्यक आहे, परन्तु, आपल्या जीवनाचे इष्टतम आचरण होण्यासाठी आपल्या अस्तित्वाच्या सर्वच पैलूंवर लक्ष द्यावे लागते: शारिरिक, मानसिक/बौद्धिक, आणि आध्यात्मिक. प्रत्येक महत्वपूर्ण आहे व त्याला हवे ते लक्ष मिळायला हवे. यापैकी आध्यात्मिक जीवनाकडे, जे आपल्या अस्तित्वाचे मूळ आहे, आपले खरे स्वरूप आहे, त्याकडे सर्वाधिक दुर्लक्ष होते. माझ्या गुरुदेवांनी असे लिहिले: “आपण आपल्या पंचेन्द्रियांच्या लहरींप्रमाणे वागणार्‍या स्वाभाविक किंवा बौद्धिक जीव नसून आपण एक सच्चिदानन्द आत्मा आहोत असे आपण आपल्या संस्कारचित्ताला जुळवून घ्यायला शिकवले पाहिजे. जागृति हा आपल्या जीवनाचा गाभा आहे.”

आपण व्यायामाने आपली शारिरिक प्रकृति सांभाळतो. आपली बौद्धिक/मानसिक प्रकृतिचे आयुष्यभर नवीन गोष्टी शिकून, आपली मनःशक्तीचा विकास करून, ती दृढ करून पोषण करतो. आपल्या भावनांचे पोषण आपण परस्पर नाती जोडून, शरणागति आणि स्वीकार यांचा सराव, करून उत्तम चारित्र्य निर्माण करायचा प्रयत्न करून, जनसेवा करून आणि एक समतोल जीवन जगून प्रयत्न करतो.

रोज धार्मिक कार्ये करून आपल्या आध्यात्मिक स्वभावाला आपण वेळ देतो. याला आध्यात्मिक व्यायाम असे म्हणायला मला आवडते. या वेळात आपण आपल्याला जीवनाचा अंतर्गत उद्देश अध्यात्म मार्गावर प्रगति करून सरतेशेवटी परमेश्वराचा अनुभव घेऊन निर्विकल्प समाधि प्राप्त करून नंतर मोक्ष, म्हणजे पुनर्जन्माच्या चक्रापासून मुक्ति मिळवणे हा आहे याची आठवण करून देतो. आध्यामिक व्यायामापेक्षा आध्यात्मिक अनुभूति मिळविण्याचा हा वेळ आहे. तिरुमंतिरम् धर्मग्रंथ म्हणतो: “एकेक पाऊल पुढे घेऊन मन मागे ओढून घ्या आणि आपल्या अंतःकरणाचे अवलोकन करा. एकेक करून तुम्हाला आतल्या अगणित उत्तम गोष्टी दिसतील. आता इथे खाली तुम्हाला कदाचित् परमेश्वराचे, ज्याला वेद सर्वत्र शोधत आहेत, त्याचे दर्शन होईल.”

साधारणपणे आपण आपल्या बाह्य स्वभावातच् इतके गुंडाळून गेलो असतो की त्यामुळे आपल्या आपल्या खर्‍या स्वभावाची, आपल्या तेजोमय अंतर्गत सत्य स्वरूपाची जाणीव नसते. बर्‍याच लोकांसाठी, जे मृत्यूचा क्षण जवळ आल्यानंतरच या विशाल सत्याचा विचार करायला सुरुवात करतात, त्यांच्यासाठी असे जन्मोजन्मी होत राहते.

एकविसाव्या शतकातल्या जीवनाची धकाधक अधिकाधिक वाढतच जात असल्यामुळे आणि जीवनावर बाह्य गोष्टींच्या अपेक्षा वाढतच जात असल्यामुळे या धकाधकीपासून दूर होऊन शांतपणे माघार घेण्याचे फायद्यांची उपेक्षाच करण्यात येते किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात येते. भारतातली अनेक कुटुम्बे रोज सकाळी घरातल्या देवघरात पूजा करून, आणि त्यानंतर जपमाळेतले मणी मोजून मंत्राचा जप करून या आध्यात्मिक जीवाला वेळ देण्याची सोय करतात.

तथापि, भारतात आणि इतर देशात अशी शिस्त पाळणार्‍या कुटुम्बांची संख्या कमी होत चालली आहे. माझ्याजवळ बसून इतके लोक असे म्हणत असतात: “आम्हाला पूजा, जप किंवा ध्यान करायला वेळच मिळत नाही.” नोकरी, जाणे-येणे, भोजन, मनोरंजन, शारिरिक व्यायाम, कुटुम्बियांच्या आणि मित्रमंडळींच्या सान्निध्यात वेळ घालवणे यातच पूर्ण दिवस संपतो. परंपरागत रोजचा एक तासाचा धार्मिक व्यायाम खूपच लांब ठरतो आहे, आणि त्याचे फायदे नीट समजत नसल्यामुळे तो साधारणपणे वगळल्याच जातो. माझे गुरुदेव त्या फायद्यांबद्दल म्हणाले: ” या रोजच्या धार्मिक कृतिमुळे तुम्ही बाह्य जगातल्या शक्तींना स्वत: विचलित न होता तोंड देऊ शकाल आणि तुम्ही जो जीवनमार्ग स्वीकार केला आहे त्याच्या धर्माचे पालन तुम्ही करू शकाल. तुमच्या दैनिक साधनेमुळे तुमची चैतन्यशक्ति नियमित केली असल्यामुळे या जगतातल्या तुमच्या कार्याचा दर्जा वाढेल, आणि ते कार्य तुम्ही आत्मविश्वास आणि शांत मनोवृत्तीने कराल.

तर याला पर्याय काय? मी मुख्यत: तरूण लोकांवर माझे लक्ष केंद्रित करतो कारण त्यांच्या वर्तणुकीचे प्रकार पक्के झाले नसतात. जेव्हाकेव्हा वेळ मिळेल तेव्हा दहा मिनिटात करता येणारा एक विधी मी योजित केला आहे. आशा आहे की संक्षिप्त आणि वेळेचे बंधन नसलेला, त्याच्या आध्यात्मिक फळांचा स्पष्ट खुलासा असल्यामुळे विद्यार्थी हा विधी स्वीकारतील किंवा त्याचप्रमाणे स्वतःचाच एक विधी तयार करतील. ही सवय वयाच्या पंधराव्या वर्षापासून सुरु करून शाळा आणि महाविद्यालयाच्या काळात कायम ठेवावी असे मला सुचवायचे आहे. अशी आशा आहे की शिक्षण संपल्यानंतर आध्यात्मिक जीवनाबद्दल आस्था असलेले या विधीचा वेळ अर्ध्या तासापर्यंत वाढवतील.

या आध्यात्मिक अभ्यासात चार कृति आहेत: पूजा, आत्मनिरिक्षण, निश्चित कथन, आणि अभ्यास. पूजा म्हणजे आपल्या इष्ट देवतेच्या मंत्राचा जप करून किंवा त्या देवतेच्या नऊ किंवा अधिक नामांचा उच्चार करून प्रत्येक मंत्रानंतर किंवा नामाचा उच्चार केल्यानंतर त्या देवतेच्या मूर्तिला किंवा छायाचित्राला अक्षता वाहणे. उदाहरणार्थ, गणपतीची पूजा करतांना ॐ श्री गणेशाय नमः किंवा तुमच्या पसंतीप्रमाणे अथवा परंपरेप्रमाणे निवडलेला मंत्र. अथवा आपल्या इष्ट देवतेचे एखादे छोटेसे भजन देवतेच्या मूर्तिवर किंवा छायाचित्रावर चित्त एकाग्र करून गायिले तरी चालेल. आदर आणि कृतज्ञता व्यक्त करणार्‍या या कृतीसाठी दोन मिनिटे द्यावी.

आत्मनिरिक्षण करण्यासाठी ॐ हा मंत्र नऊ वेळा आपले डोळे बंद करून जपावा. या मंत्राचा व्यवस्थित प्रभाव पडायला त्याचा उच्चार बरोबर करणे आवश्यक आहे. पहिले अक्षर अ, दुसरे उ आणि तिसरे म. या तीन्ही अक्षरांचा विलम्बित उच्चार करावयाचा असतो. प्रत्येक ॐ एकूण सात सेकंद म्हणायचा असतो: दोन सेकंद अ, दोन सेकंद उ आणि तीन सेकंद म. (भाषांतरकाराची टीप: मराठी वाचकांना ॐ चा उच्चार इंग्रजी शब्दांचा आधार घेऊन शिकविण्याची आवश्यकता असे वाटत नाही त्यामुळे त्या स्पष्टीकरणाचे भाषांतर येथे प्रस्तुत केलेले नाही.) अ चा उच्चार करतांना आपल्याला आपले उदर आणि छाती यांचे स्पंदन होत असल्याची जाणीव होते. उ चा उच्चार करतांना कंठाचे स्पंदन होते. आणि म चा उच्चार करतांना आपल्या शिराचे (डोक्याच्या वरच्या भागाचे) स्पंदन होते. या कृतीला दोन मिनिटे द्यावी.

निश्चित कथन म्हणजे आपल्या मनावर संस्कार करून भविष्यकाळी उत्तम परिणाम घडवून आणण्यासाठी पुनरुच्चार केलेले वाक्यविशेष. यांत “माझे सध्या सर्व ठीक चालले आहे”, (I am alright right now.) हे वाक्य नऊ वेळा म्हणावयाचे असते. दुसरी दोन निश्चित कथनाची वाक्ये अशी: “माझ्या सर्व गरजा नेहमीच पूर्ण होतील.” (All my needs will always be met) किंवा “मी योजिलेले सिध्दीस नेण्यास मी समर्थ आहे, मी करू शकतो, मी करीन. (I can, I will, I am able to accomplish what I plan). निश्चित कथन परिणामकारक रीतीने वापरण्यासाठी तीन पदरी किल्ली आहे ती अशी: १. आपण काय म्हणतो आहे त्याच्या अर्थावर मन केन्द्रित करणे, २. जो परिणाम आपण प्राप्त करू इच्छितो त्याला आपल्या मन:चक्षूपुढे बघणे, आणि ३. तो परिणाम प्राप्त केल्यानंतर भविष्यात आपल्याला काय भावना मनात येतील त्या वर्तमानकाळातच अनुभवणे. यासाठी एक मिनिट द्यावा.

अभ्यास म्हणजे आपल्याला ज्ञान आणि अंतर्दृष्टी देणार्‍या हिंदु धर्मग्रंथाचे वाचन. तांत्रिक आणि गूढ ग्रंथ टाळून स्पष्ट शब्दात लिहिलेले, प्रेरणा देणारे ग्रंथ निवडावे. या कार्याला पाच मिनिटे द्यावी.

या चार धार्मिक कृतींचे काय फायदे आहेत? पूजेचा फायदा आहे की आपली भक्ति वाढते आणि आपला आणि आपल्या आराध्य देव/देवतेचा संबंध वाढवते. परिणामी पूर्ण आत्मार्थपूजा करण्याकडे जाण्याच्या मार्गावरची ही पहिली साहाजिक पायरी आहे. ॐ चा जप केल्याने मनःशांति मिळते, आपली शक्ति आपल्या मनाच्या आध्यात्मिक भागावर वृध्दित होते, आणि उच्च स्तरावरील चक्राकडे जाते. प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधि या सारख्या योगाच्या गूढ अभ्यासाकडे जाण्याची हे पहिले पाऊल आहे. निश्चित कथनाने आपला आत्मविश्वास वाढतो, जेणेकरून आपण आपल्या सर्व कार्यात यशस्वी होतो. निश्चित कथन हे चिंतेवरचे उत्तम औषध आहे. धर्मग्रंथांचे अध्ययन आपले आपल्या धर्माबद्दल ज्ञान वाढवते आणि हिंदु तत्वज्ञान व प्रथांच्या मागच्या कल्पनेंबद्दल अर्थ समजण्यास मदत करते.

हे लक्ष्यात ठेवणे आवश्यक आहे की आध्यात्मिक मार्गावरची आपली प्रगति, जिचे अंतिम ध्येय परमेश्वराची अनुभूति मिळवणे, निर्विकल्प समाधि प्राप्त करणे, पुनर्जन्माच्या चक्रापासून मुक्ति मिळविणे, मोक्षप्राप्ति होणे या सर्व गोष्टी आपण आपल्या धार्मिक अभ्यासावर किती वेळ वाहतो त्यावर अवलंबून आहे.

पतञ्जलि ऋषींनी आपल्या योगसूत्रात म्हटले आहे (१.२२;२२): “ज्यांची भक्ति तीव्र आहे त्यांना समाधि जवळ आहे. आपला अभ्यास योग सौम्य, मध्यम किंवा तीव्र आहे याने ही त्यावर परिणाम होतो. ऋषि असे सुचवित आहेत की आपली आध्यात्मिक मार्गावरची प्रगति केवळ आपण त्यावर किती वेळ देतो त्यावरच फक्त अवलंबून नसून आपण त्यावर किती भक्ति, शक्ति आणि प्रयत्न करतो त्यावर अवलंबून आहे.” यावरचे त्यांचे तिसरे सूत्र म्हणते: “समाधि ईश्वरभक्तिनेही प्राप्त होऊ शकते.” याचा अर्थ आहे की आपले प्रयत्न आणि समर्पण तीव्र ईश्वरभक्तिने मिळालेल्या आशीर्वादाने किंवा कृपेने वृद्धित होतात.

Leave a Comment

Your name, email and comment may be published in Hinduism Today's "Letters" page in print and online. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Scroll to Top