हिंदु धर्मातील देवालयातल्या प्रमुख प्रकारच्या पूजनाबद्दल ज्ञान आणि त्याच्या गुह्य मूलतत्त्वांवर विचार

English |
Tamil |
Kannada |
Hindi |
Portuguese |
Marathi |
Spanish |

सद्गुरु बोधीनाथ वैलाणस्वमी

देवळातल्या मूर्तीपूजेची आपण शाकाहारी भाजी, आमटी करण्याशी तुलना करु या. ही भाजी करण्यासाठी तुम्ही कच्ची भाजी स्वच्छ करण्यापासून सुरुवात करता. त्यानंतर वरचे साल, खाण्यास अयोग्य भाग काढता, आणि त्याचे छोटे तुकडे करता. कढ‍ईत थोडे तेल गरम करून त्यांत वेगवेगळे मसाल्याचे पदार्थ, वाळलेल्या मिरच्या, मोहरी, आणि मूठभर दाळ घालता. (येथे स्वामीजींनी फोडणी देण्याचे वर्णन करण्याचा प्रयत्न केला आहे हे वाचकांच्या लक्ष्यात आले असेलच.) मोहरी फुटून वांस ये‍ऊ लागल्यावर त्यांत कढीलिंबाची पाने आणि कांदा घालता. ते थोडे तांबूस झाल्यानंतर त्यांत टोमॅटो घालता आणि थोडा वेळ मंद उष्णतेवर शिजवता. त्यानंतर मीठ, हळद, तिखटासारख्या मसाल्यांची पूड इत्यादि घालून आणखी थोडा वेळ शिजू देता. आणि शेवटी त्यांत कच्च्या, वाफेवर किंवा उकळून शिजवलेल्या, भाजून किंवा तळलेल्या भाज्या घालता आणि पूर्ण होतपर्यंत शिजवता. कुठलाही उत्तम स्वयंपाकी आपल्याला सांगेल की एका बेचव भाजीचे चविष्ट भाजीत रूपांतर करण्यासाठी अनेक पदार्थ लागतात. असे पक्वान्न आपल्या शरीराचे पोषण करते, तर आपल्या आत्म्याचे पोषण मंदिरातल्या पूजेने होते.

पूजा प्रभावी होण्यासाठी एका ज्ञात मार्गाचे अनुसरण केले पाहिजे आणि अनेक आवश्यक पदार्थ उपलब्ध हवेत.

१. प्रथम आहे ते म्हणजे त्या मंदिराचा अंतरलोकाशी असलेला सम्बन्ध, जो देवळादेवळापासून बदलत असतो. हा सम्बन्ध अगदी घनिष्ठ असावा लागतो. आम्ही याची तुलना संगणकाचा जालकृतीशी करतो. एक T1 संपर्क उदहरणार्थ प्रकाशावर आधारित असलेल्या शिघ्रतम गतीच्या संपर्काच्या तुलनेत फारच थोडा दत्तांश स्थानान्तरित करु शकतो. मंदिराच्या अन्तरलोकांशी असलेल्या संपर्काची शक्ति तीन गोष्टींवर अवलंबून आहे: ते मंदिर एखाद्या देवतेचा साक्षात्कार झाल्याने स्थापन करण्यात आले होते, त्या देवळात किती वर्ष अखण्ड पूजा चालू आहेत, आणि दर वर्षी किती आणि किती प्रभावशाली पूजा होतात यांवर.

२. प्रभावी पूजेचा दुसरा महत्वाचा घटक म्हणजे ठरवलेला दिवस. त्या देवतेच्या पूजेसाठी शुभ दिवस असावा. श्री गणेशासाठी वार्षिक गणेश चतुर्थी हा एक अत्यंत शुभ दिवस आहे. मासिक चतुर्थी देखील गणपतीच्या पूजेसाठी इतर दिवसांपेक्षा अधिक अनुकूल आहे. या दोन्हीसाठी शुभ काळ ज्यावेळी त्या तिथीची किंवा नक्षत्राची शक्ति असते तो काळ. उदाहरणार्थ, हवा‍ईमध्ये ई.स. २०२० मध्ये गणेश चतुर्थी २१ सप्टेंबरच्या सकाळी ७ वाजल्यापासून २२ सप्टेम्बरच्या सकाळी ५ वाजेपर्यंत होती. भक्तांच्या सोयीसाठी काही मंदिरे वार्षिक उत्सवांच्या पूजा आठवड्याच्या शेवटी (शनिवार/रविवार) करतात. हे काही आदर्श नाही.

३. तिसरा घटक आहे तो म्हणजे पूजा करणाऱ्या पूजारी किंवा पुजाऱ्यांचे कौशल्य. ज्ञान, पावित्र्य, गूढ ज्ञानाचा बोध आणि त्यांची भक्तीचे गांभिर्य. पूजाविधीमध्ये हे पुजारी आपले मंत्र, मुद्रा, उपचार यांनी त्या देवतेचे आवाहन करतात. ते त्या देवतेला त्या मूर्तीत आपल्या भक्तांच्या प्रार्थना स्वीकार करण्यासाठी, स्थापित होण्यासाठी प्रार्थना करतात, आणि त्यां सर्वांवर आपले आशीर्वाद आणि प्रेमाचा वर्षाव करण्याची याचना करतात. माझे गुरु, शिवाय शुभ्रमुनीय स्वामी या प्रक्रियेबद्दल आणखी एक बोध देतात: “जेव्हा तुम्ही देवळात देवाची पूजा करता तेव्हा तुम्ही त्या दैवी शक्तीला सूक्ष्मतम विश्वातून या जड विश्वात आणता. त्यासठी हवी असलेली शक्ति तुम्ही तुमच्या पूजेतून, भक्तीतून, तुमच्या विचारांतून आणि तुमच्या भौतिक तेजोमंडलातून पुरवता. पुजारी हे घडण्यासाठी त्या पाषाण मूर्तीला पवित्र करून त्यांत आकर्षण शक्ति निर्माण करतो. देव देवता, त्या देखील त्या मूर्तीत शक्ती उत्पन्न करीत असतात आणि सरतेशेवटी तो क्षण येतो आणि ते त्या सूक्ष्म विश्वातून या स्थूल विश्वात येतात आणि लोकांना आशीर्वाद देतात. तुम्हाला असे वाटते की ते केवळ क्षणभरच तेथे होते परन्तु त्यांच्यासाठी तो काळ दीर्घ होता. अन्तरलोकांत काळाची कल्पना वेगळी आहे.

आधुनिक हिंदु धर्मात आता संस्कृत ऐवजी इतर भाषांत पूजा करण्याकडे कल झुकतो आहे. त्याचे एक समर्थन असे करण्यात येते की भक्तांना त्या चालू असलेल्या मंत्रोच्चारांचा अर्थ कळेल. अर्थातच ही कल्पना वेद आणि आगम, जी या मंत्रांचे स्रोत आहेत, यांनी समर्थन केलेली नाही. परंपरेप्रमाणे हे सर्व मंत्र केवळ संस्कृतमध्येच म्हटले जातात. माझा असा अनुभव आहे की प्रादेशिक भाषांमध्ये म्हटलेल्या मंत्रांनी संस्कृत मंत्रांसारखी शक्ति उत्पन्न होत नाही. गुरुदेवांनी हे स्पष्ट केले की संस्कृत पूजा मंत्रच अत्युत्तम काम करतात, जेणेकरून देवतेच्या उपस्थितीचे आह्वान केले जाते. ईश्वरावरच्या आपल्या प्रेमांत आपले हृदय विरघळून टाकू शकणारी प्रादेशिक भाषातील असंख्य भक्तिगीते उत्तम रीतीने आपले कार्य करतात. त्यांनी असे सुचवले की प्रादेशिक भाषा अचूक अर्थ आणि स्पष्टीकरण करण्यात उत्तमप्रकारे उपयुक्त ठरतात.

४. हे चौथे घटक आमच्या काही वाचकांना चकित करून सोडेल – उपस्थित असलेल्या भक्तांच्या वर्तणूकने पूजेच्या सामर्थ्यांत फरक पडू शकतो. अनेक वर्षांपूर्वी का‍उ‍आ‍इ आधिनामच्या संन्यासी लोकांनी केलेल्या पूजांच्या वेळी ही गोष्ट माझ्या ध्यानात आली. हे संन्यासी अनेक पूजा रात्री उशिरा किंवा भल्या पहाटे, जेव्हा भक्त उपस्थित नसतात तेव्हा करतात. असे लक्ष्यात आले की श्रद्धायुक्त मनाने उपस्थित असलेले भक्त हे या प्रभावी पूजेचे महत्वाचे घटक आहेत. का बरे? कारण हे भक्त त्यांच्या पूजेने त्यांच्या आशिर्वाद मिळविण्याया तळमळीने त्यांच्या मनोविचारांनी आणि त्यांच्या भौतिक तेजोमण्डलाने ते या पूजेला शक्ति पुरवतात.

५. पांचवा घटक आहे नैवेद्य: फळांच्या फोडी, पक्वान्न, पाणी, सुवासिक फुले आणि दूध. पूजेच्या अन्तर्भूत क्रियेत हे नैवेद्याचे पदार्थ एक महत्वाचे अंग असतात. देवता हे भौतिक पदार्थ स्वतः वापरत नाहीत तथापि त्यातील प्राणशक्ति पुजारी जेव्हा तो नैवेद्य दाखवतो तेव्हा वापरतात.

हेच तत्त्व यज्ञ किंवा होमाला लागू पडते. जयेन्द्रपुरी महास्वामीजी, बेंगळुरुच्या कैलाश आश्रमाचे प्रमुख, यांनी काही वर्षापूर्वी आमच्या हावा‍ईच्या मठाला भेट दिली. त्यांच्या तीन पुरोहितांनी आमच्या कडवुल मंदिरांत भारतातून आपल्या बरोबर आणलेया धान्यांची आणि समिधांची आहुति दे‍ऊन एक अत्यंत सांग्रसंगीत यज्ञ केला. त्यानंतर स्वामीजींनी असे समजावून सांगितले की अग्नि ह्या आहुति देवतांना शुद्ध रूपांत पोहोचवून देतो. देवता ते पदार्थ उपस्थित असलेल्या लोकांना आशीर्वाद देण्यासाठी वापरतात.

जेव्हा पूजेमध्ये हे पांच घटक उपलब्ध असतात तेव्हा हा पूजाविधी एक अत्यंत प्रभावी प्रसंग होतो ज्यांत अन्तरलोकांतून महत्वपूर्ण आशिर्वाद प्रकट होतात. मध्यम लांबीच्या पूजेत हे आशीर्वाद अंतिम आरतीच्या वेळी मिळतात. अधिक विस्तत पूजेत हे आशीर्वाद देवता अलंकृत करून झाल्यानंतर पडदा हटवून भक्तांना प्रदर्शित करण्यात येते तेव्हा मिळतात. या दोन क्षणी ती देवता आणि त्याचे सहकारी किंवा देव त्यांना मिळालेला प्राण प्रत्येक भक्ताच्या प्रभामंडलात त्यांच्या सूक्ष्म चित्तातील अनुबंध दूर करण्यासाठी परत पाठवतात. अशा प्रकारचे आशीर्वाद मिळालेले भक्त प्रसन्न चित्ताने आणि आपले मानसिक ओझे हलके करून देवळातून प्रस्थान करतात. त्यातले काही अधिक शांतिपूर्वक जीवन जगण्यास, आपल्या घरांत अधिक एकोप्याने आणि समाजांत अधिक सहिष्णुतेने वागण्यास प्रयुक्त होतात. काही आपली हिंदु संस्कृति, पवित्र संगीत, कलाआणि नृत्य यांच्या द्वारे प्रस्तुत करण्यास आणि ही परंअपरा पुढे चालू ठेवण्यास प्रेरित होतील.

इतरांना त्या देवतेकडून त्यांचा आयुष्यमार्ग बदलणारा संदेश कदाचित् मिळेल. गुरुदेव या गुह्य प्रक्रियेचे असे वर्णन करतात: ”दशन समजून घेण्यासाठी आपल्या दैनंदिन आणि तरी सुद्धा मार्मिक भाषेची देवाण-घेवाण बघा. तुम्ही माझ्या आवाजाचे ध्वनी तुमच्या ऐकण्याच्या अवयवांनी, कर्णेन्द्रियानी, ऐकत आहात. त्याचा अर्थ तुमच्या मनांत येतो कारण तुम्हाला या स्पंदनांचे, मी बोलत असलेल्या तुम्हाला ज्ञात असलेल्या भाषेत, भाषांतर करण्याचे प्रशिक्षण मिळले आहे. दर्शन हेही एक स्पन्दन आहे. ते प्रथम त्या देवतेच्या गाभाऱ्यातल्या भौतिक आकाराचा ओझरत्या दर्शनाच्या रुपाने होते. त्यानंतर ही भौतिक दृष्टि दिव्य दृष्टीत आपल्या शरीरातल्या चक्रातून रूपान्तरित होते. या चक्रांतून एक सूक्ष्म संदेश मिळतो, नेहमीच सावध स्थितीतच नाही असा. कदाचित् तात्काळही नाही, परन्तु या दर्शनाचा संदेश थेट महादेवाकडून, सरळ श्री गणेशाकडून, सरळ भगवान मुरुगनकडून, सरळ भगवान शिवाकडून तुमच्या आयुष्यात प्रकट होतो.

देव अशा प्रकारे संभाषण करतात. हे संभाषण आपण दररोज आपल्या संभाषणाच्या भाषेत अनुभवतो त्यापेक्षा अधिक सत्य आहे. हे संभाषण ताबडतोब समजण्याची गरज नाही. कदाचित् भक्त देवळातून आपल्याला काही संदेश मिळाला आहे अशी काहीही बाह्य कल्पना न बाळगता किंवा या दर्शनाचा काय अर्थ आहे हे त्याच्या बुद्धीला न समजता निघून जाईल. हे जे तुम्ही वाचता आहात ते शब्द देखील कित्येक दिवस आठवडे किंवा महिने सुद्धा तुम्हाला उमजणार नाहीत. त्याचा गुह्य अर्थ मननाने स्वयं उमलू लागेल.

तुम्ही यानंतर देवळात पूजा किंवा होमासाठी उपस्थित राहाल तेव्हा या अनेक सूक्ष्म आणि स्थूल अंगांवर विचार करा, जे हे देवदेवतांशी एक पवित्र संबन्ध, एक गहन संभाषण स्थापित करतात.

—ॐ—